शरद पवारांचे राज्य सरकारला फटकारे
अहमदनगर : महागाईच्या विरोधात शिवसेनेने केलेले आंदोलन अभिनंदनीय असले तरी सत्तेत राहून शिवसेनेने अशी भूमिका घेणे बरे नाही. एकतर परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा नाहीतर पूर्णपणे रस्त्यावर तरी उतरायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. ते अहमदनगर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पवारांनी रामदास आठवले यांचीही खिल्ली उडविली.
आठवलेंना गांभीर्याने घेऊ नका
शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये आणि जरी शिवसेना बाहेर पडलीच तरी सरकार स्थिर राहिल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी रविवारी केला. मुंबईतल्या दादर चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली यावेळी ते बोलत होते. आठवले म्हणाले, शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आमदारांची गरज भासल्यास राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीनेही पाठिंबा नाही दिला तरी सरकार स्थिर राहण्यासाठी 15 आमदारांची गरज आहे. 15 आमदार सहज पाठिंबा देतील, कारण तीन वर्षात पुन्हा निवडणूक घेण्याची आमदारांची इच्छा नाही. आठवले यांचा हा दावा खोडून काढण्यासाठी शरद पवार यांनी अहमदनगर येथील कार्यक्रमात बोलताना आठवलेंना लागलीच उत्तर दिले. पवार म्हणाले, रामदास आठवलेंना गांभीर्याने घेऊ नका ते विनोदी आहेत.
महागाईवरून भाजपवर टीका
शनिवारीच पवार यांनी महागाईवरून भाजप सरकारला लक्ष्य केले होते. देशात सध्या जो राजकीय पक्ष सत्तेत आहे, त्यांनी विरोधात असताना वेगवेगळे चित्र जनतेसमोर मांडले, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी जाहिरात केली, पण आज हा सवाल त्यांनाच विचारावा वाटतो आहे, असे शरद पवार म्हणाले होते. अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचेही ते म्हणाले होत.