कर्जमाफी स्वागतार्ह पण, अपुरी : शरद पवार

0

पुणे : राज्यातील 40 लाख शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेला कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय स्वागतार्ह आहे, मात्र तो पूर्णपणे समाधानकारक नाही. या निर्णयातून आंदोलक शेतकर्‍यांनी केलेल्या मागण्या पूर्ण होत नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
या निर्णयामुळे आपण संपूर्ण समाधानी नाही. मात्र सरकारला वेळ देण्याची आपली तयारी आहे, असेही त्यांनी पुणे येथेआयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

थकबाकीचे कारण शोधायला हवे
पवार म्हणाले, की सरकारचे हे पहिले पाऊल आहे. काही शेतकरी नेते त्याबाबत आत्ताच नाराजी व्यक्त करू लागलेत. मात्र, हा निर्णय योग्य की अयोग्य याबाबत आत्ताच बोलणे योग्य राहणार नाही. शेतकरी थकबाकीदार का होतो याचे मूळ कारण शोधायला हवे. स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशी लागू करू जाहीरनाम्यात नमूद केले होते. मोदींनी देखील यााबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार लवकरात लवकर या शिफारसी लागू करण्यात याव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

निर्यातबंदी उठवावी
कर्जमाफी ही 30 जून 2017 पर्यंतच्या थकबाकीदारांना मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने 30 जून 2016 पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. राज्यात कांद्याचे दर कोसळलेत. तुरीचे उत्पादन जास्त झाल्याने त्या तुरीचे काय करायचे असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे आहे. त्यासाठी सरकारने या दोन पिकांवरची निर्यातबंदी उठवावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

पूर्णवेळ संरक्षणमंत्री हवा
काश्मीरबाबत केंद्र सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. पाकिस्तानसोबत युद्ध करा, असे मी म्हणणार नाही. पण कडक कारवाई करण्याची गरज आहे. त्यासाठी देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री असणंही आवश्यक आहे, असं मत पवार यांनी मांडले. कश्मीरचे लोक सरकारला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतात. मात्र कधी कधी सुरक्षा रक्षकांकडून काश्मिरी जनतेसाठी त्रासाची ठरेल अशी कारवाई होते आणि मग त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येते. तेही आपलेच नागरिक आहेत, हे ओळखून त्यांना वागणूक मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जातीयवाद्यांच्या मनात खदखद
शिवरायांनी अफझलखानाला मुस्लिम होता म्हणून नाही तर स्वराज्याचा, रयतेच्या राज्याचा शत्रू होता म्हणून मारले या विधानाचा त्यांनी पुनरूच्चार केला. छत्रपती शिवरायांनी कधी जात-धर्माचा विचार केला नाही. अफझलखानाला जसा मारला तसा कृष्णाजी कुलकर्ण्यालाही मारला. स्त्रियांबाबत गैरवर्तन करणार्‍या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडले. बजाजी निंबाळकर, जावळीचे मोरे अशा कित्येकांवर शस्त्र चालवली. पण माझ्या विधानाचे हवे ते अर्थ घेण्यात आले. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणार्‍यांच्या मनात किती खदखद आहे हेच यातून दिसून येते असेही पवार यांनी यावेळी सांगितले.