राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिकांपैकी सर्वात श्रीमंत जळगाव महानगरपालिका आहे.परंतु हुडकोच्या कर्जामुळे आर्थिक संकट ओढवले.त्यामुळे आर्थिक कोंडी झाली. परिणामी जळगाव शहराचा विकास खुंटला. विकासाचा प्रश्न पुढे आला की,आर्थिकतेचा मुद्दा पुढे यायचा.मात्र आता हुडकोच्या कर्जातून मुक्ती झाली,नव्हे तर कर्जातून मुक्ती होणारच असल्याने जळगावकरांनाही काही प्रमाणात आनंद झाला असेल असे म्हणायला हरकत नाही.महानगरपालिकेवरील आर्थिक संकट टळल्यामुळे जळगावकरांना मुलभूत सुविधांची निश्चितच अपेक्षा असणार आहे.त्यामुळे सत्ताधार्यांनी विकासाचे व्हिजन लक्षात घेणे अनिवार्य आहे.
तत्कालिन जळगाव नगरपालिकेने घरकुलसह विविध 22 योजनांसाठी हुडको आणि जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले होते. यातून काही योजना पूर्ण झाल्यात तर काही योजना अपूर्ण राहिल्या आहेत. हुडकोकडून 141 कोटी 34 लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते भरणे सुरुच आहे.आतापर्यंत 375 कोटी 21 लाख इतकी रक्कम भरली गेली आहे.याचा अर्थ मुद्दल पेक्षा व्याजच अधिक भरला गेला आहे. दरमहा 3 कोटींचा हप्ता असल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पदाधिकार्यांसह प्रशासनाचीही तारेवर कसरत सुरु आहे. गेल्या काही वर्षापासून मनपाची आर्थिक झाल्यामुळे जळगावकरांनी विकासच बघितला नाही. परिणामी नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत.मनपाच्या आर्थिक परिस्थिीतीचा बाऊ केल्यामुळे जळगावरही हतबल झाले होते. पण आता काहिसी परिस्थिती बदललेली आहे. मनपात सुरुवातीला सुरेशदादांची अर्थात सुरेशदादा प्रणित खान्देश विकास आघाडीची सत्ता होती. आणि केंद्रात व राज्यात आघाचीचे फार प्रस्थ नसल्यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागला ही वस्तूस्थिी नाकारता येणार नाही. विकासासाठी राजकीय इच्छाशक्ती जेवढी महत्वाची आहे.तेवढीच केंद्र आणि राज्यसरकारचेही सहकार्य तेवढेच महत्त्वाचे आहे.मात्र जळगावकरांचे दुर्भाग्य की, केंद्राचे व राज्याचे जळगाव महानगरपालिकेला सहकार्य मिळाले नाही.त्यामुळे जळगाव महापालिकेच्या संबंधित अनेक प्रश्न प्रंलबित राहिल्याने आर्थिक कोंडी अधिक गडद होत गेली.
आश्वासनपूर्तीसाठी एक पाऊस पुढे
2018 मध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाली. भाजपाने ही निवडणूक विकासाच्या मुद्दयावर लढविली. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे आणि महापालिकेत भाजपला सत्ता दिली तर विकास करु असा दावा पालकमंत्री गिरीष महाजन,आ.राजूमामा भोळे यांनी केला होता. हुडकोच्या कर्जातून मनपाला मुक्त करु,सात वर्षापासून प्रलंबित असलेला गाळ्यांचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देवून मनपाची सत्ता जळगावकरांनी भाजपच्या हाती निर्विवादपणे दिली. पण वर्षभरात जळगावकरांच्या पदरात निराशा आली.मात्र आता आगामी विधानसभेचे पडघम वाजू लागल्यामुळे दिलेल्या आश्वासनपूर्तीची सत्ताधार्यांना चाहुल लागली,आणि एक पाऊल पुढे टाकले. जिल्हा बँकेच्या कर्जफेडीनंतर हुडकोच्या कर्जातून मुक्ती करत दिलेले आश्वासन सार्थ ठरविले.खरे तर ही जळगावकरांच्या दृष्टीने आशादायी आणि आनंददायी बाब आहे. कारण, हुडकोच्या कर्जामुळे केवळ महानगरपालिकेवरच नव्हे तर प्रत्येक जळगावकरांच्या डोक्यावर कर्ज होते. आता मनपा तर कर्जातून मुक्त झालीच. परंतू प्रत्येक जळगावकरही मुक्त झाले आहे.
विकासाचे आव्हान
जळगाव शहराचा गेल्या काही वर्षापासून विकास खुंटला आहे. समांतर रस्ते,व्यापारी संकुलातील मुदत संपलेले गाळे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.साध्यासाध्या मुलभूत सुविधा नाहीत. शहरातील रस्त्यांची तर पूरती वाट लागली आहे. रस्ते आणि रस्त्यातील खड्डे जीवघेणे ठरले आहे. समांतर रस्त्यांअभावी आणि खड्डयांमुळे कितीतरी जीव गेले आहे. आता हुडकोच्या कर्जाचा भार कमी होवून कारवाईचे गंडातर टळले आहे. त्यामुळे विकासकामे करण्यास वाव मिळणार असल्याने आमदार राजूमामांसह मनपा पदाधिकार्यांसमोर विकासाचे आव्हान पुढे ठाकले आहे. हे आव्हान निश्चितपणे पेलतील असा आशावाद जळगावकरांना आहे.