कर्जमुक्तीसाठी शेवटपर्यंत शेतकर्‍यांसोबत उभे राहणार

0

भुसावळ । शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मृदा आरोग्य कार्ड, नीम कोटेडे युरिया, परंपरागत कृषी विकास योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय कृषी बाजार योजना, पंतप्रधान पीक विमा योजना आदी योजना फक्त कागदावरच राबवत आहे, संपूर्ण कर्जमुक्तसाठी शिवसेना अंतिम क्षणा पर्यंत प्रयत्न करणार असून शेतकर्‍यांच्या पाठीशी खंभीरपणे उभी राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर यांनी केले.

वझरखेड येथे 700 शेतकर्‍यांशी साधला संवाद
जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताह दरम्यान शिवसेना संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर यांनी भुसावळ परिसरातील शेतकरी बांधवांशी वझरखेड येथे 700 शेतकरी बांधवांशी संवाद साधला. पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, वझरखेड सरपंच विकास पाटील तसेच जिल्हा व तालुका कार्यकारणी व ग्रामपंचायत पदाधिकारी सोबत विलास मुळे, ललित मुथा, प्रा.धिरज पाटील, अजय पाटील, नितिन देशमुख, निलेश ठाकुर, आकाश पाटील उपस्थित होते. प्रा. धिरज पाटील यांनी सूत्रसंचालन व प्रस्ताविक मांडले. तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी आभार मांडले.

निसर्गाची अवकृपा, शेतमालाला भाव न मिळाल्याने येणारे सुलतानी संकट अशा कचाट्यात अडकून कर्जाच्या ओझ्याखाली पिचल्यानेच शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र सत्ताधारी शेतकर्‍यांना काही शब्दांनी अपमानीत करतात, अल्पभुधारक शेतकर्‍यांना कर्जमाफी देवून सरकार संपकरी व इतर शेतकर्‍यांमध्ये फुट पाडत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केला.