कर्जमुक्ती, दीडपट हमीभावावर संसदेत विधेयके आणणार

0

खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिपादन

मुंबई :– देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा यासाठी दोन स्वतंत्र खासगी विधेयके आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत मांडणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. खासदार राजू शेट्टी म्हणाले, गेल्या २० आणि २१ नोव्हेंबरला देशभरातील १८८ शेतकरी संघटनांनी राजधानी दिल्लीत किसान मुक्ती आंदोलन सुरु केले आहे. यात शेतकरी आत्महत्येवरही एक विशेष सत्र होते. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत शेतकऱ्यांच्या व्यथांची दखल घेतली जात नाही अशी खंत व्यक्त केली.

शेतकऱ्याशी संबंधित दोन विधेयके आम्ही किसाम मुक्ती संसदेत सादर केली. देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा अधिकार २०१७ आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा अधिकार अशी दोन विधेयके सादर केली. या विधेयकांचा मसुदा देशभर घेऊन जावे. शेती क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करुन, वेबसाईटद्वारे या मसुद्यावर सूचना मागवून त्यातून अंतिम मसुदा तयार करावा, असे ठरले. त्यासाठी किसान मुक्ती संसदेने दोन समित्याही स्थापन केल्या आहेत. त्यानंतर सर्वंकष असा हा मसुदा लोकसभेत आणि राज्यसभेत सादर करावा असा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही विधेयके आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत मांडणार आहोत. त्याआधी नवी दिल्लीत पुन्हा एक चर्चासत्र ठेवले जाणार आहे. त्याला सगळ्याच राजकीय पक्षांना निमंत्रण करण्यात येणार आहे. तसेच या दोन विधेयकांना पाठिंबा देण्याबाबत त्यांना विचारणा केली जाईल. ज्यांची सहमती असेल त्यांनी या विधेयकांना लोकसभा, राज्यसभेत पाठिंबा द्यावा आणि ही विधेयके मंजूर करुन घ्यावीत, अन्यथा या विधेयकांना त्यांचा विरोध आहे हे स्पष्ट होईल. तसेच येत्या १९ जानेवारीला मुंबईत याअनुषंगाने एक दिवशीय चर्चासत्र ठेवण्यात आले आहे. त्याला उच्च न्यायालयातील वकीलांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. प्रत्येक राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी अशी चर्चा घडवून आणत आहोत, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

26 जानेवारीला संविधान बचाव मोर्चा
प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला मुंबईत होत असलेल्या संविधान बचाव आंदोलनाबाबत खासदार राजू शेट्टी म्हणाले, गेट वे ऑफ इंडियाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दोन तास मूक धरणे आंदोलन केले जाणार आहे. देशात सध्या जे वातावरण निर्माण झाले आहे, सर्वसामान्य नागरिकांच्या कायदा, घटनेवरील विश्वासाला तडे जात आहेत. अलीकडेच भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी घटनेसंदर्भात वक्तव्य केले. घटना बदलण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत, अशी वक्तव्ये भाजपचे नेते वरचेवर करीत आहेत. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय मिळायला हवा, अशी भावना व्यक्त केली त्यामुळे अख्खा देश हादरुन गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना या देशाला दिली. ज्या घटनेवर हा देश चालला आहे, त्याची मोडतोड करण्याचे काम होत आहे. भाजपला लोकांनी बहुमत घटना बदलण्यासाठी दिलेले नाही, लोकांनी विकासाच्या मुद्यावर सत्ताधारी मंडळींना बहुमत दिले. आम्हीही त्यांना समर्थन दिले होते. भाजप देशापुढील प्रश्न सोडवील.

शेतकऱ्यांना चांगले दिवस आणतील अशी अपेक्षा होती. कुणा एका नेत्याच्या नेतृत्वात हे संविधान बचाव आंदोलन होत नाही, कोणत्याही एक पक्ष अथवा झेंड्यावर हे आंदोलन होणार नाही, पूर्णपणे अराजकीय असे हे आंदोलन असणार आहे. घटना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, त्याआधी या आंदोलनाच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासोबतही राजू शेट्टी यांनी चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार कपिल पाटील उपस्थित होते.