कर्जरोख्यांचे ‘सेलिब्रेशन’; पण पुणेकरांवर व्याजाचा भुर्दंड!

0

पुणे : चोवीस तास पाणीपुरवठ्याचे कोणतेही काम अद्याप सुरू झाले नसल्यामुळे कर्जरोख्यांतून उभारलेले दोनशे कोटी बँकेकडे परत करण्याची मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासनाकडे केली आहे. कर्जरोख्यांचे सेलिब्रेशन करून मोठ्या गाजावाजात 200 कोटी रुपये पालिकेच्या खात्यात जमा करून घेतले पण आता पहिल्याच महिन्यात तब्बल दीड कोटी रुपयांचे व्याज भरावे लागले आहे. त्यात समान पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया नाही, कोणते कामही सुरू नाही आणि अंदाजपत्रकातील 500 कोटींची तरतूद यावर्षी खर्ची पडणारही नाही, असे असताना 200 कोटींचे कर्ज कशासाठी घेतले असा सवालही आबा बागुल यांनी केला आहे.

जर रक्कम खर्च होणारच नसेल तर दीड कोटी रुपये व्याजाचा भुर्दंड पुणेकरांवर लादण्यापेक्षा कर्जाची रक्कम परत बँकेला देणेच हिताचे ठरेल अन्यथा त्यासाठी न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत बागुल म्हणाले की, महापालिका प्रशासनाने चालू अंदाजपत्रकात समान पाणीपुरवठ्यासाठी 500 कोटींची तरतूद असतानाही 200 कोटी रुपये कर्जापोटी पालिकेच्या स्वतंत्र खात्यात जमा करून घेतले. प्रत्यक्षात या योजनेच्या कामावर एक रुपयाही खर्च झालेला नाही. या 200 कोटी रुपयांच्या कर्जाच्या व्याजापोटी पालिकेला दरमहा 1 कोटी 50 लाख रुपये भरावे लागणार आहेत. हा नाहक भुर्दंड पुणेकरांवर पडणार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. कोणत्याही परिस्थितीत करदात्या पुणेकरांवर व्याजाचा बोजा पडू दिला जाणार नाही त्यासाठी न्यायालयात दाद मागितली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.