कर्जाच्या आमिषाने निगडीतील महिलेची फसवणूक

0

पिंपरी-चिंचवड : विजया फायनान्समधून कर्ज देण्याचे आमिष दाखवून निगडी येथील एका महिलेची 64 हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना दिल्ली येथून सायबर क्राईम सेल पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आरोपींवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 सी, 66 डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविध खात्यांवर भरले पैसे
निगडी येथील एका महिलेने वेबसाईटवर कर्जासाठी विनंती केली होती. त्या महिलेस विजया फायनान्समधून फोन आल्याचे भासवून कर्जाच्या प्रथम नोंदणीसाठी अडीच हजार रुपये भरण्यासाठी सांगितले. महिलेने ती रक्कम एका बँक खात्यात भरली. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावरून फोन करून एक लाख 60 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. परंतु, त्यासाठी प्रोसेसिंग फी व इतर वेगवेगळी करणे सांगून आरोपींनी महिलेस एकूण 61 हजार 450 रुपये विविध खात्यावर भरण्यास भाग पाडले. आरोपींनी मागितलेली रक्कम खात्यावर भरल्यानंतरदेखील महिलेच्या खात्यावर कर्जाची रक्कम न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यावरून महिलेने निगडी पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल केली.

कॉल सेंटरवरच छापा
या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर सेलच्या पथकाने शामकुमार प्रेमकुमार झा (वय 25, रा. शिवशख मार्ग, कुंदपुरी, दिल्ली), उषा उर्फ खुशी प्रेमलाल गुप्ता उर्फ खुशी अगरवाल (वय 26, रा. आझादपुरी, दिल्ली), दीपचंद्र शर्मन सिंग (वय 27, रा. नगला मनी, फिरोजाबाद) या तिघांना शिवमार्केट प्रितमपुरा, दिल्ली येथे चालू असलेल्या कॉल सेंटरवर छापा मारून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून सात मोबाईल, नऊ सिमकार्ड, एक वॉकी, आठ एटीएम कार्ड, तीन पॅनकार्ड, चेकबुक असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक दीपक लगड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस हवालदार अस्लम अत्तार, पोलीस नाईक अजित कुर्‍हे, पोलीस नाईक दीपक भोसले, राजकुमार जाबा, अमित औचरे, बाबासाहेब कराळे, अनुप पंडित, संतोष जाधव, अंकिता राघो यांनी केली. पुढील तपास निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अवताडे करीत आहेत.