सोयगाव । कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकरी कुटुंबियांचे कर्जमाफीच्या यादीतही नाव समाविष्ट न झाल्याने कर्ज फेडण्याची चिंता आणि पाल्यांच्या शिक्षणाची भेडसावणारी चिंता यामुळे गोंधळलेल्या शेतकर्याने भाकरीचे पीठ असलेल्या डब्यात विषारी औषधाची कालवण करून संपूर्ण कुटुंब संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना निंबायती(न्हावी तांडा)ता.सोयगाव येथे घडली. दरम्यान या घटनेतील विषबाधित झालेल्या दोन चिमुकल्यांचा उपचारादरम्यान जळगावच्या सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला तर तिघांची प्रकृती गंभीर आहे.
नंतर जेवण करतो सांगून पती परतलाच नाही
5 एकर क्षेत्रावर लावलेला कपाशी पिकाचे तुटपुंजे उत्पन्न निघाले त्यातही कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने बेभाव कापसाची विक्री करावी लागली. त्यामुळे कुटुंबाच्या उदारनिर्वाहाची चिंता असलेल्या शेतकर्याला रब्बीसाठी पैसाच जवळ नव्हता, मुलांच्या शिक्षणाची चिंता भेडसावत असलेल्या शेतकर्याने कुटुंब संपविण्याचा निर्धार करून सोमवारी 20 रोजी सायंकाळी शेतातून पत्नीच्या आधी घरी येवून भाकरीच्या पिठाच्या डब्यात पोलो नावाचे औषध मिसळवून टाकले. पत्नी कावेरीबाई नियमित शेतातून घरी येवून कुटुंबियांसाठी स्वयंपाक करत होती. हा प्रकार तिच्या लक्षातच आला नसल्याने संपूर्ण कुटुंब जेवायला बसले असतांना पती राजू रतन राठोड याने तुम्ही जेवून घ्या मी नंतर जेवतो असे सांगून बाहेर निघून गेला अद्यापही परतलेला नाही. दरम्यान या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
रात्री 10 वाजेच्यानंतर पत्नी कावेरीबाई राजू राठोड (वय-32), मुलगी ज्योती राठोड (वय-13), गोगली राठोड (वय-8), मुलगा राहुल राठोड (वय-10), दिनेश दिलीप राठोड (वय-10) या पाच जणांना रात्री उलट्या होवू लागल्याने तातडीने उपचारासाठी पिंपळगाव(हरे) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने जळगावला हलविण्यात आले. मुलगी ज्योती राठोड (वय 13), गोगली राठोड (वय-8) या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर राहुल राठोड, दिनेश राठोड, पत्नी कावेरी राठोड यांची प्रकृती चिंताजनक आहे.
आकस्मिक मृत्यूची नोंद
दरम्यान या घटनेप्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ सुजित बडे यांनी निंबायती (न्हावीतांडा) ता.सोयगाव गावाला तातडीच्या भेटी दिल्या,व घटनेची माहिती घेतली. दोन बालकांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.