कर्जोद शिवारात दगडफेकीत उपनिरीक्षकासह दोन पोलीस कर्मचारी जखमी
रस्ता वहिवाटीवरून वाद विकोपाला : 17 जणांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा
रावेर : तालुक्यातील कर्जोद शिवारातील एका शेती शिवारातील गट नं. 247 ब मधील वहिवाटीचा रस्ता पोलिस बंदोबस्तात मोकळा करत असताना विरोधी गटाने दगडफेक केली. त्यात उपनिरीक्षक मनोजकुमार वाघमारे यांच्यासह दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. जखमींमध्ये एक पुरुष व एक महिला कर्मचार्याचा समावेश आहे. या प्रकरणी एकूण 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयीतांना अटक करण्यात आली. अटकेतील संशयीतांना रविवारी रावेर न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
कर्जोद शिवारातील वहिवाटीचा रस्ता मोकळा करून तार कंपाउंड करण्याचे काम शनिवारी दुपारी अडीच वाजता सुरू होते. त्यावेळी गोकुळ हुकुमचंद चारण, देवा नारायण चारण, हुकूम किसन चारण, पुनाबाई हुकूम चारण, रमाबाई देवा चारण, गोकुळ नारायण चारण, लाभो नारायण चारण, भूराबाई लाभो चारण, परवीन कान्हा चारण, भिकन बुवा चारण, दादू भिकन चारण, नारायण राणा चारण, लीनाबाई गोकुळ चारण, राजेश हरी चारण, चेतन कान्हा चारण, कान्हा नारायण चारण, सोनाबाई कान्हा चारण व इतरांनी मारहाण, दगडफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दगडफेकीत बंदोबस्तासाठी असलेले उपनिरीक्षक मनोजकुमार वाघमारे, महिला पोलिस माधवी मोरे व पुरुष पोलिस कर्मचारी श्रीराम वानखेडे जखमी झाले. माधवी मोरे यांच्या फिर्यादीवरून वरील 17 संशयीतांसह सहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत गोकुळ हुकूमचंद चारण, देवा नारायण चारण, हुकूम किसन चारण, पुनाबाई हुकूम चारण व रमाबाई देवा चारण या संशयीताना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. जखमी उपनिरीक्षक वाघमारे, पोलिस कर्मचारी माधवी मोरे व श्रीराम वानखेडे यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट देऊन शांतता निर्माण केली.