जळगाव (प्रदीप चव्हाण)। जिल्ह्यातील खरीप लागवडीला साधारण मे महिन्याच्या शेवटच्या अथवा जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होत असते. यावेळी पावसाळा केरळ राज्यात लवकर दाखल होणार असुन त्यानंतर लगेचच जिल्ह्यात पाऊस धडकण्याची शक्यता वेध शाळेने वर्तविली आहे. पावसाळ्यांची चाहुल लागल्याने शेतकरी वर्ग शेती कामाच्या तयारीला लागला आहे. मात्र खरीप लागवडीसाठी मिळणार्या पिक कर्जांचे मे महिना संपत चालला असतांनाही वाटप होत नसल्याने पैशा अभावी शेती कामे मंदावली आहे. जिल्हा बँक शेतकर्यांना लवकर कर्ज पुरवठा करत नसल्याने शेती कामे खोळंबली आहे. वेळेवर कर्ज पुरवठा झाल्यास शेतकर्यांना शेती तयार करण्यास मदत होणार आहे. अन्यथा खरीप लागवडीला उशीर होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेने अंग झटकले
खरीप हंगामासाठी कर्ज घेण्यासाठी मागील कर्ज भरणा करणे आवश्यक असल्याने शेतकर्यांनी व्याजाने पैसे काढून कर्ज परतफेड केली. कर्ज भरणा झाल्यानंतर 10 दिवसात नवीन कर्ज मिळते मात्र ते मिळत नसल्याने शेतकर्यांना व्याजाचा भुर्दड सहन करावा लागतो आहे. जिल्हा बँक स्टेट बँक रोकड पुरवठा करत नसल्याने कर्ज वितरणास अडचण येत असल्याचे सांगुन या प्रश्नातुन अंग काढून घेत आहे.
रोकड अभावी कर्जास विलंब
जळगाव जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या 250 शाखा आहे. खरीप हंगामास लवकरच सुरुवात होणार असल्याने सर्वच शेतकर्यांकडून पिक कर्जाची मागणी आहे. जिल्ह्याभरातील जिल्हा बँकेला रोजच्या व्यवहारासाठी 5 ते 10 कोटी रुपयाची आवश्यकता असते मात्र जिल्हा बँकेतर्फे 10-15 लाखाची तोकडी रोकड उपलब्ध होत असल्याने कर्ज वितरणास मोठी अडचण होत आहे.
खते,बियाणे खरेदीचा प्रश्न
खरीप हंगामाला या वर्षी लवकर सुरुवात होईल असे सुतोवाच असल्याने शेती मशागतीला जोर आला आहे. मात्र कर्ज वेळेवर मिळत नसल्याने खरीप लागवडीसाठी आवश्यक बि-बियाण्यांची खरेदी कशी करणार असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच शासनाने 25 कापुस बियाण्यांवर बंदी आणली आहे. यात सर्वाधिक मागणी असलेल्या राशी 659चा देखील समावेश आहे. बियाणे लवकर उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.
भारतीय स्टेट बँक आम्हाला रोकड उपलब्ध करुन देत नसल्याने कर्ज वितरणास अडचण निर्माण झाली आहे. जशी रोकड उपलब्ध होत आहे त्याप्रमाणात कर्ज वितरण सुरु आहे. 31 मे नंतर पुर्ण कर्ज वितरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– जितेंद्र देशमुख (व्यवस्थापक जिल्हा बँक)
रिझर्व्ह बँकेमार्फत आमच्याकडे रोकड पुरवली जातो. ती जिल्ह्यातील सर्व बँकांना पुरवली जातो. रिझर्व्ह बँकेकडून तोकडी रोकड मिळत असल्याने त्यात जिल्हा बँकेला आवश्यक तेवढी रक्कम आम्ही देवू शकत नाही.
-शिरीष कोल्हे (प्रबंधक एसबीआय)