पुणे – सवलतीच्या दरात कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने खराडी येथील “स्व- आधार मायक्रो फायनान्सच्या (बालाजी ग्रुप)’ संचालिकेने ४९ जणांची तब्बल सव्वापाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संचालिकेच्या विरोधात चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदाकिनी अवताडे (वय २९, रा. खराडी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार बालाजी ग्रुप कंपनीच्या संचालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी महिलेची खराडी येथील समर्थ कॉलनीतील राघोबा पाटील नगरमध्ये “स्व-आधार मायक्रो फायनान्सच्या (बालाजी ग्रुप)’ ही फायनान्स कंपनी आहे. या फायनान्स कंपनीच्या माध्यमातून एक ते दहा लाखांपर्यंतची कर्जे सवलतीच्या दारात मिळवून दिली जातील, अशी जाहिरात या कंपनीच्या वतीने करण्यात आली होती.
सदरील जाहिरात पाहून अनेक गरजू नागरिकांनी या फायनान्स कंपनीशी संपर्क साधला असता संचालक महिलेने कर्जदारांकडून प्रोसेसिंग फी घेतली होती. त्याद्वारे या महिलेने ४९ कर्जदारांची तब्बल सव्वापाच लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास चालु असून या घोट्याळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यंता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. निरगुडकर अधिक तपास करत आहेत.