जळगाव । साधारण जिल्ह्यातील खरीप लागवडीला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होते. शेतीचे कामे सध्या सुरु असुन शेतकर्यांकडून पिक लागवडीची तयारी केली जात आहे. लागवडीसाठी आवश्यक असलेल्या बी-बीयाण्याची खरेदी शेतकर्यांना करावी लागणार आहे. मात्र जिल्हा बँकेद्वारे कर्ज वाटप न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. येत्या आठवड्याभरात जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांना कर्ज वाटप झाले पाहिजे अन्यथा जिल्हा बँकेचे संचालक पदाधिकारी अधिकारी यांना बँकेत येऊ देणार नाही व त्यांना काळे फासले जाईल असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतिष पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी जिल्हा बँकेला निवेदन देण्यात आले. जिल्हा बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
या होत्या मागण्या
शेतकर्यांना पुर्वी प्रमाणेच रोख पध्दतीने कर्ज वितरीत करण्यात यावे, कर्ज माफी निर्णय होईपर्यत शेतकर्यांना थकबाकीदार न समजता तातडीने अल्पमुदत शेती कर्ज वितरीत करावे, कर्ज वाटपासाठी कोणत्याही कार्डची सक्ती करु नये, शेतकर्यांकडून फक्त मुद्दल घेऊन व्याजाची फेड शासनाने व बँकेने करावी, पिक कर्जात दरवर्षाप्रमाणे 5 टक्के वाढ करावे, कापसाला हेक्टरी 75 हजार तर केळीला 1 लाख कर्ज द्यावे अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
पदाधिकार्यांनी निवेदन घ्यावे
शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असून खरीप हंगाम तोंडावर आले असतांना जर कर्ज मिळाले नाही तर शेतकरी आत्महत्या आणखी वाढतील. शेतकर्यांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे शिंगाडा मोर्चा काढण्यात येणार होता पंरतु जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असल्याने निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते गाडीतुन जिल्हा बँकेत आले. जिल्हा बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन यांनी शेतकर्यांसंबंधी संवेदनशीलता दाखवून निवेदन घेण्यासाठी यायला हवे होते. असे आमदार पाटील यांनी सांगितले.
रोकड अभावी उशीर
जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या 250 शाखा असल्याने दररोज 5 ते 10 कोटी रुपयाची आवश्यकता असते. जिल्ह्याभरातील शेतकर्यांकडून कर्ज मागणी होत असल्याने आणि स्टेट बँकेकडून कमी प्रमाणात रोकड उपलब्ध होत असल्याने कर्ज पुरवठा करण्यास विलंब होत आहे. 31 मे पर्यत सर्व शेतकर्यांना कर्ज पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करत असल्याचे जिल्हा बँक व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांनी निवेदन घेतांना सांगितले.
यांची होती उपस्थिती
विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे जिल्हा बँकेला निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार डॉ.सतिष पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार दिलीप वाघ, गफ्फार मलिक, संजय गरुड, वसंत मोरे, विलास पाटील, योगेश देसले, विकास पवार, कल्पना पाटील, कल्पीता पाटील आदी उपस्थित होते. तसेच असंख्य शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.