पिंपरी-चिंचवड : शहरात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक आपल्या वाहनांना कर्णकर्कश हॉर्न बसवून ध्वनिप्रदूषण करत आहेत. कर्णकर्कश हॉर्नमुळे दुसरे वाहनचालक विचलित होऊन अपघात होण्याची शक्यतादेखील बळावत आहे. त्याचप्रमाणे दुचाकी तसेच चारचाकी वाहन निर्मिती करणार्या कंपन्यांकडून वाहनांना बसवण्यात येणारे सायलेन्सर काढून त्याऐवजी विचित्र व मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसवण्याचा प्रकारदेखील होत आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, वाहनांमध्ये असे बदल करणे गुन्हा असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन उप प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना देण्यात आले आहे.
हेडलाईटमध्येही बदल
काही वाहनधारक वाहनांच्या हेडलाईटमध्येही बदल करतात. नॉनसर्टिफाइड बल्ब, चित्रविचित्र उघडझाप करणारे बल्ब बसवले जात आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी इतर वाहन चालकांची एकाग्रता भंग होते. परिणामी अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून वाहनांमध्ये कर्णकर्कश हॉर्न बसवणे, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावणे, हेडलाईटमध्ये बदल करणे असे प्रकार करणार्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे.
उत्पादन थांबवावे
वाहनांच्या नियमबाह्य असणार्या अॅक्सेसरीजचे उत्पादनदेखील थांबवले पाहिजे. त्याचप्रमाणे अशी नियमबाह्य अॅक्सेसरीज विक्री करणार्या दुकानदारांवरही कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन समितीने केली आहे.