गाले। भारत आणि श्रीलंकेतील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरुवात होत आहे. या मालिकेत यजमान संघाविरुद्ध मागील मालिकेतील यशाची पुनरावृत्ती करण्याबरोबर परदेशातील कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीसमोर असेल. भारताने 2015 मध्ये येथे तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली होती. त्यानंतर विराट सेनेत बरेच काही बदल झाले आहेत. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील अव्वलस्थानावरील संघ म्हणून भारतीय संघ लंकेत दाखल झाला आहे. भारतीय संघाने मायदेशात 13 कसोटी सामन्यांपैकी 10 जिंकले आहेत. एक सामना गमावला तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मागील दौर्यात धोनीकडून विराटकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्यावेळी शास्त्री संचालक म्हणून संघासोबत होते. आता सगळी समिकरणे बदलली आहेत. विराट तिन्ही क्रिकेटच्या तीन्ही प्रारुपांमध्ये संघाचा कर्णधार आहे. शास्त्री आता संघाचे प्रशिक्षक आहेत. मायदेशात भारतीय संघाची कामगिरी चांगली असली तरी परदेशातही तसाच खेळ करण्याचे दडपण संघावर असणार. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघातही अनेक बदल झाले आहेत. कच्चालिबू असलेल्या झिम्बाब्वेनेही एकमेव कसोटीत त्यांना जेरीस आणले होते.
भारताने गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर चार कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामने भारताने गमावले आहेत. या मैदानावरील मागील दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ पराभूत झाला असल्यामुळे यावेळी येथे पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याचे प्रयत्न संघाला करावे लागतील. श्रीलंकेने या मैदानावर 29 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 17 सामने त्यांनी जिंकले आहेत आणि सहा सामने गमावले. याठिकाणी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने लंकेला दोनदा हरवले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून एकदा पराभूत झाला आहे.
गॉल इंटरनॅशनल स्टेडियम भारतासाठी अनलकी ठरले आहे. या मैदानावर भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध केवळ एकच सामना जिंकता आलेला आहे. चार पैकी तीन सामने भारताने गमावले आहेत. मायदेशात दादा ठरलेल्या भारतीय संघाची परदेश दौर्यावर मात्र फारशी चांगली कामगिरी झालेली नाही. यापुढे भारतीय संघ सतत परदेशात खेळणार आहे. चांगला खेळ करण्याचे दडपण असेल. अष्टपैलू हार्दिक पंड्या या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. कोहलीने संकेत दिले आहे. हार्दिक या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये असू शकतो.
उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार). शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, रुद्धीमान सहा (यष्टिरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वरकुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अणि अभिनव मुकुंद. श्रीलंका : रंगना हेरथ (कर्णधार), उपुल थरंगा, दिमुथ करुणारत्ने, कुसाल मेंडिस, अँजोलो मॅथ्यूज, असेला गुणरत्ने, निरोशन डिक्वेला (यष्टिरक्षक), धनंजय डिसिल्वा, धनुष्का गुणतलिका, दिलरुवान परेरा, सुरंगा लखमल, लाहिरु कुमारा, विश्व फर्नांडो, मिलिंद पुष्पकुमार आणि नुवान प्रदीप. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल.