कर्णधार म्हणून धोनीचा खरा वारसदार विराट कोहलीच

0

कोलकता : विराट कोहलीच महेंद्रसिंह धोनीचा कर्णधार म्हणून खरा वारसदार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे. दादाने विराटच्या चांगल्या खेळासोबतच त्याच्या नेतृत्वकुशलतेवर देखील विश्वास दाखवत त्याच्यामध्ये भरपूर क्षमता असून तो तीन इंडियाला नव्या शिखरावर नेईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

संघ निवडीबद्दल गांगुली म्हणाला, की एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मध्ये कोहलीच कर्णधार म्हणून धोनीचा खरा वारसदार आहे. त्याची कामगिरी अप्रतिम राहिलेली आहे, त्यामुळे त्याची निवड होण्यात शंकाच नव्हती. कोहली आता कसोटीप्रमाणे एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 सामन्यातही भारताला यशाच्या शिखरावर नेईल. युवराजसिंग संघात निवड होणे, योग्यच आहे. मला विश्वास आहे, की तो नक्कीच धावा करून यश मिळवेल.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारताच्या कर्णधारपदी विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे. तसेच अष्टपैलू युवराजसिंगचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. या निवडीपूर्वी धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्याच्याजागी कर्णधारपदी कोणाची निवड होईल, याची उत्सुकता होती. अखेर कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीचीच तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली.