कर्णबधिर तरुणास लुटणारेे तिघांना जेरबंद

0

पोलीस कर्मचार्‍याने दुचाकीने पाठलाग पकडली रिक्षा
जळगाव । व्यापार करण्यासाठी दुचाकी खरेदी करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथून आलेल्या कर्णबधिर तरुणास जळगावातील एका रिक्षाचालकासह तिघांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील 30 हजार रुपये व मोबाइल लुटल्याची घटना महामार्गावरील टीव्ही टॉवर गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्याचवेळी जिल्हापेठचे पोलीस कर्मचारी संजय दोरकर नशिराबादहून जळगावला येत असताना कर्णबधिर तरुणाने त्यांची मदत घेतली. दोघांनी दुचाकीने पाठलाग करुन खेडीजवळ रिक्षा अडवून तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

गजानन प्रल्हाद पवार (वय 38) या तरुणास कैलास पांडुरंग चौधरी (वय 46, रा.तुकारामवाडी), सतीश उर्फ सुरेश पीतांबर सोनवणे (वय 43, रा.पिंप्राळा) व रिक्षाचालक संदीप नारायण मोरे (वय 35, रा.रामेश्‍वर कॉलनी) या तिन्ही भामट्यांनी लुटले होते. गजानन हा निमखेडी येथे पोंगे विक्रीचा व्यवसाय करत असून तो 95 टक्के कर्णबधिर आहे. व्यवसाय करीत असताना त्याला दुचाकीवर फिरावे लागते. त्यामुळे त्याने जुनी दुचाकी विकून सेकंड हॅण्ड दुचाकी खरेदीसाठी तो गुरुवारी दुपारी 2.30 वाजता तो एसटी बसने जळगावात आला. तो रिक्षात (एमएच-19, व्ही-8088) बसून जे.जे.ऑटो येथे दुचाकी खरेदीसाठी गेला. तत्पूर्वी रिक्षाचालक संदीपने याने सतीश व कैलास या दोन साथीदारांना बोलावून घेतले होते. गजानन याला दुचाकी पसंत न आल्यामुळे त्याने पुन्हा बस स्थानकात सोडून देण्याचे रिक्षाचालक संदीपला सांगीतले; परंतु त्या तिघांनी त्याला दुपारी 2.30 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शहरात फिरवले. त्यानंतर टीव्ही टॉवर परिसरातील निर्मनुष्य शेताकडे नेवून तिघांनी गजाननला मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी देत त्याच्या खिशातील 30 हजार रुपये व एक मोबाइल काढून घेतला. यानंतर तिघे भामटे रिक्षानेच पुन्हा जळगावच्या दिशेने पळून गेले. शेतातून बाहेर येत गजानन याने महामार्गावर लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. योगायोगाने याचवेळी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी संजय दोरकर हे नशिराबादहून जळगावकडे येत होते. गजानन याने त्यांनाच मदत मागून रिक्षाचा पाठलाग करण्यास सांगीतले. दोरकर यांनी खेडी येथे रिक्षा अडवून चौकशी केली. गजानन याने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षा जप्त करण्यात आली आहे. रिक्षाचालकांच्या या भामटेगिरीची तिसरी घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.