कर्णयंत्रामुळे ‘अमन’च्या अस्तित्वाला मिळाला आधार

0

दीप फाऊंडेशनतर्फे गरजू मुलाला कर्णयंत्राची मदत

पिंपरी : मुकबधिर मुलांना ऐकायला येत नसल्याने ती मुले बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कानावर शब्द पडणे गरजेचे असते. श्रवणयंत्रामुळे त्यांना ऐकायला मदत मिळते, या उद्देशातून दीप फाऊंडेशन फॉर एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशल वेलफेअरच्यावतीने पिंपरीतील एका गरजू मुलाला श्रवणयंत्र देण्यात आले. श्रवणयंत्र मिळाल्याने त्या मुलाच्या जगण्याला आधार मिळाला आहे. पिंपरीतील संत तुकारामनगर येथे हा श्रवणयंत्र प्रदान सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी दीप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक कुमार, डॉ. विजय एम. गोडांकर, संजीव रॉय तसेच फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. ‘अमन’ या गरजू मुलाला हे यंत्र देण्यात आले.

समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
अमनला लहानपणापासूनच ऐकायला येत नाही. ऐकायला न आल्याने तो प्रतिसाद देण्यास शिकू शकला नाही. जोपर्यंत कानावर एखाद्याचे बोलणे, आवाज पडत नाही. तोपर्यंत अमन त्यावर प्रतिसाद देऊ शकत नाही. श्रवणयंत्र मिळाल्यामुळे त्याला ऐकू येण्यास मोठी मदत होणार आहे. ऐकू आल्याने तो प्रतिसाद द्यायला शिकेल आणि चांगल्या पद्धतीने बोलू शकेल. श्रवण यंत्र बसविल्यामुळे मला चांगले ऐकायला येत असल्याची पहिली प्रतिक्रिया अमन याने श्रवणयंत्र बसविल्यानंतर दिली. दीप फाउंडेशनच्यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, स्वाईन फ्लूबाबत जनजागृती आदींचा समावेश आहे, अशी माहिती अभिषेक कुमार यांनी दिली.