कर्तव्यदक्ष निरीक्षक किसनराव नजन पाटलांची मुख्यालयात बदली

0

सोशल मिडीयात राजकारण जिंकले, अधिकारी हरल्याच्या प्रतिक्रिया ; भाजपा पदाधिकार्‍यांच्या मारहाणीनंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांचा निर्णय

चोपडा- शिस्त व कर्तव्यप्रिय अधिकारी म्हणून जिल्हाभरात ख्याती असलेल्या चोपड्याचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची भाजपा पदाधिकार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, असे म्हटले जात असलेतरी येथे मात्र राजकारण जिंकल्याचा व अधिकारी हरल्याचा प्रतिक्रिया आता सोशल मिडीयातून उमटत आहेत. एखाद्या पोलिस अधिकार्‍याच्या वर्दीवरच हात टाकणार्‍या निरीक्षकांना बदलीची शिक्षा दिली जात असेल तर जिल्ह्यातील अधिकार्‍यांनी यापुढे काम कसे करावे? असा प्रश्‍न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

नियंत्रण कक्षात केली बदली
भाजपा पदाधिकार्‍यांची चारचाकी अडवल्यानंतर त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती तर तत्पूर्वी भाजपा पदाधिकार्‍यांनी थेट नजन-पाटील यांच्यावर वर्दीवरच हात टाकल्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी नजन-पाटील यांच्या बदलीची मागणी देखील आपण करणार असल्याचे सांगितले होते मात्र शुक्रवारी रात्रीच निरीक्षकांच्या बदलीचे आदेश धडकले असून त्यांना नियंत्रण कक्षात हजर राहण्यास कळवण्यात आले आहे. सुज्ञ चोपडा वासीयांना या बदलीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पुन्हा त्यांना शहरात आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.