कर्तव्यदक्ष पोलिसांचा चाकण नगरपरिषदेकडून सत्कार

0

चाकण : चाकणमधील रुद्र प्रवीण कोळेकर या साडेचार वर्षांच्या शाळकरी विद्यार्थ्याची पंधरवड्यानंतर शिताफीने सुटका करून अपहरणकर्त्यांना गजाआड करणारे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, उपनिरीक्षक महेश मुंडे व या तपास पथकातील पोलिसांचा चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पूजा कड, शिवसनेचे नगरपरिषदेतील सत्तारूढ गटनेते किशोर शेवकरी यांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक अ‍ॅड. प्रकाश गोरे, हृषीकेश झगडे, प्रकाश भुजबळ, प्रवीण गोरे, नगरसेविका मंगल गोरे, हुमा शेख, सुजाता मंडलिक, स्नेहा जगताप आदी उपस्थित होते. चाकणमधील विद्यानिकेतन प्रशालेत ज्युनिअर के. जीच्या वर्गात शिकणारा चिमुरडा रुद्र कोळेकर याचे शुक्रवारी (दि. 24 मार्च) संदीप ठोकळ याने अपहरण केले होते. त्यानंतर रुद्र यास भूगाव येथील कविता ठोकळ यांच्या घरी ओलीस ठेवले होते. अपहरण केल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी पंधरा लाखांच्या खंडणीसाठी मुलाच्या वडिलांना आलेल्या फोननंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने अपहरण केलेल्या विद्यार्थ्याच्या जीवाला कसलाही धोका होणार नाही याची दक्षता घेत अपहरणकर्त्या दोघांना गजाआड करून मुलाला मुळशी तालुक्यातून सहीसलामत ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या या कामगिरीमुळे चाकण परिसरातील तमाम नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता.