धुळे । हिरे मेडिकल कॉलेज येथे रात्रपाळीला गार्ड ड्युटीवर असलेले चार पोलिस हत्यार सोडून बेपत्ता झाल्याचे आढळून आले. गार्ड ड्युटींवर असतांना कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरुन पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी त्या चारही पोलिसांना निलंबीत केले आहे. पोलिसांचा बेजाबदारपणा उघड झाल्याने अश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. धुळे येथे दंगल झाली होती. या दंगलीतील संशयितांना हिरे मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संशयितांसाठी गार्ड ड्युटी लावण्यात आलेली असतांना पोलीस कर्मचारी हत्यार सोडून निघून गेल्याचे उघड झाल्यावर खळबळ उडाली आहे.
दंगलीमधील संशयितावर पहारा
धुळे शहरातील स्टेशनरोड भागात दोन दिवसांपूर्वी दंगल झाली होती. यातील काही संशयित हिरे मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल होते. तेथे हवालदार भरत सुर्यवंशी, कलीम शेख फजलू, मयूर थोरात, राजू हरि मोरे या पोलिसांना गार्ड ड्यूटीवर नेमण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांनी रात्री हिरे मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी केली असता तेथे सदरचे चारही पोलीस कर्मचारी गैरहजर आढळून आले. मात्र, त्याची हत्यारं तेथेच पडून होती.
पोलिस अधिक्षकांकडे पाठविला अहवाल : याबाबतचा अहवाल निरीक्षक वडनेरे यांनी थेट पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांच्याकडे पाठविला. या अहवालावर तात्काळ निर्णय घेऊन अधीक्षक रामकुमार यांनी सुर्यवंशी, कलीम शेख, थोरात व मोरे यांना तडकाफडकी निलंबीत केले. ज्या ठिकाणी चारही पोलिसांना ड्युटी लावली होती. ते तेथे हजर नव्हते. याबाबतचा अहवाल प्राप्त झाला होता. कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरुन चारही पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे.
कर्तव्यात कसूराचा ठपका : पोलीस हत्यार सोडून गेले असतांना काही अनुचीत प्रकार घडला असता तर या कल्पनेच थरकाप उडाला आहे. पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांनी तपासणी केली नसती तर ही घटना उघडकीस आलीच नसती. दंगलीसारख्या गंभीर गुन्ह्यांतील संशयितांना तसेच हत्यार सोडून गेल्याने ते चारही पोलीसांनी प्रथमदर्शनी दोषी दिसत आहेत. त्यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.