कर्तृत्ववान माणसांचा सन्मान केला पाहिजे

0

मुंबई : ‘शून्यातून यशस्वी झालेल्या कर्तुत्ववान माणसांचा सन्मान केला पाहिजे’, असे प्रतिपादन जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी 14 व्या जागतिक मराठी संमेलनात केले. जागतिक मराठी अकादमी व छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ याचे उद्घाटन शिवाजी मंदिर, दादर येथे पवार यांच्या हस्ते झाले. संमेलनाची सांगता रविवार दि. 8 जानेवारी रोजी होणार आहे.

मराठी माणसं हात पसरताना दिसत नाहीत
पवार यांनी सांगितले की, जगाच्या पाठीवर असलेल्या यशस्वी कर्तुत्ववान माणसांचे विचार अनुभवण्यासाठी जागतिक मराठी परिषदेने जागतिक मराठी अकादमीची स्थापना केली. मराठी माणसं देशात आणि देशाबाहेर विविध क्षेत्रात यशस्वी झालेली दिसतात. मराठी माणसं कधी कोणासमोर हात पसरताना दिसत नाहीत. कष्ट करायलाही मागे पुढे बघत नाहीत, असे सांगून त्यांनी विविध देशात यशस्वी झालेल्या अनेकांची उदाहरणे दिली. जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष, अमेरिका येथील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश राचमाले यांनी हयाप्रसंगी वायगांव (लातुर) ते वॉशिंग्टन पर्यंतची आपली जीवन वाटचाल नव्या पिढीसमोर मांडली. हया समारंभास ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर व जयंत सावरकर यांना जीवनगौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हे जागतिक मराठी संमेलन चित्रपट, रंगभूमी, कला, साहित्य, क्रिडा आणि ज्ञान, माहिती आणि मनोरंजन हयावर आधारित असून हया संमेलनात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इस्त्राईल, कतार, लंडन, युके इत्यादी देशातील लोक सहभागी झाले होते.