कर्नल पुरोहितही सुटणार!

0

नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला. तब्बल नऊ वर्षानंतर पुरोहित तुरूंगाबाहेर येणार आहे. पुरोहितने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल आणि ए. एम. सप्रे यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला. तसेच मोक्काही हटविण्यात आला आहे. पुरोहितच्या जामिनासाठी प्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती.

साळवेंचा युक्तिवाद कामी आला
महाराष्ट्रातील मालेगाव या मुस्लीमबहुल शहरातील मशिदीबाहेर सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या स्फोटात 6 जण ठार तर 100 जण जखमी झाले होते. याप्रकरणात पुरोहितवर थेट आरोप सिद्ध झाले नसल्याने व ते सिद्ध झाले तरी केवळ 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. परंतु, पुरोहितने 9 वर्ष कारावास भोगल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही साळवे यांनी केली होती. या आधी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंहविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने तिला सशर्त जामीन मंजूर केला होता. त्याचवेळी कर्नल पुरोहितने जामिनासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कर्नल पुरोहितने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने पुरोहितच्या जामिनाला विरोध केला होता. मात्र न्यायाच्या दृष्टीकोनातून पुरोहितला जामीन मंजूर केला पाहिजे. मालेगाव प्रकरणात आरोपी प्रज्ञासिंह ठाकूरला जामीन मिळतो मग पुरोहितला का नाही? एनआयएची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप साळवे यांनी केला होता. साक्षीदारांच्या साक्षीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पुरोहितला अखेर सोमवारी जामीन मंजूर केला.

कोण आहेत हरीश साळवे?
हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतातील माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची भारत सरकारकडून बाजू मांडली होती. महाराष्ट्राचे सुपूत्र असलेले साळवे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील आहेत. त्यांनी कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी फक्त 1 रुपये फी घेतली होती. याच साळवे यांनी पुरोहितला जामीन मिळवून दिला आहे.

पुरोहित पुणेकर…
कर्नल पुरोहितचे वडील बँक अधिकारी होते. पुण्यात जन्म झाला असून, अभिनव विद्यालयात शालेय शिक्षण घेतले तर गरवारेत महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
1994 मध्ये चेन्नईत सैन्य अधिकारी प्रशिक्षण घेऊन मराठा लाईट इन्फ्रट्रीमध्ये दाखल. जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असताना आजारी पडल्याने सैन्याच्या गुप्तहेर विभागात पाठवले.
2002 पासून 2005 पर्यंत पुरोहितने सैन्याच्या इंटेलिजन्स फिल्ड सिक्युरिटी यूनिट एमआय-25 मध्ये काम केले. जम्मू-काश्मीरमधील विविध दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला.

नाशिकच्या देवळालीत लायजन यूनिट ऑफिसर म्हणून आल्यानंतर निवृत्त मेजर रमेश उपाध्यायशी संपर्कात. उपाध्याय अभिनव भारत संघटनेचा संस्थापक आहे. तसेच मोलगाव स्फोटातील आरोपी आहे.
पुरोहितवर स्फोटासाठी सैन्याचे 60 किलोग्राम आरडीएक्स चोरल्याचा आरोप लावण्यात आला. यातील आरडीएक्स मालेगाव बॉम्बस् फोटात वापरण्यात आल्याचाही आरोप आहे.

विरोधकांचा भाजपवर आरोप
साध्वी प्रज्ञा सिंह पाठोपाठ कर्नल पुरोहितला जामीन मिळाल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. कर्नल पुरोहितला जामीन मिळाला; हे अपेक्षितच होते. बॉम्बस्फोटांशी संबंधित आरएसएसच्या सर्व आरोपींना हे सरकार वाचवत आहे. यासाठीच एनआयए प्रमुखांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. निवृत्तीनंतर कदाचित त्यांना बक्षीसही मिळेल, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून केला आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनीही भाजपला टोला हाणला आहे. जामीन मिळाला याचा अर्थ पुरोहित निर्दोष आहेत आणि त्यांची सुटका झाली, असा होत नाही, असे तिवारी म्हणाले. एमआयएमचे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कर्नल पुरोहितच्या विरोधात ठोस पुरावे असल्याचा दावा केला आहे. तर, काँग्रेसने हिंदू आतंकवादाच्या नावावर निष्पाप लोकांना अडकवल्याचा पलटवार भाजपने केला आहे.