नवी दिल्ली । कर्नाटकच्या मोहम्मद शफी अरमार या व्यक्तीला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी (ग्लोबल टेररिस्ट) म्हणून घोषीत केले आहे. शफी अरमार याच्यावर नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीने (एनआईए) दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटसाठी काम केल्याबद्धल खटला दाखल केला होता. अमेरिकेच्या अर्थमंत्रालयाने केलेल्या घोषणेत शफी अरमार याला विशेष जबाबदारीवर असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी असे म्हटले आहे. अमेरिकेने केलेल्या घोषणेनुसार शफी अरमारवर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक देवाण-घेवाणीवर बंदी आहे. अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने शफी अरमार याच्यासह इस्लामिक स्टेटसंबंधीत तीन वेगवेगळे दहशतवादी इसा अल-बिनाली (बहरीन), उमर अल-कुबैसी (इराक) आणि ओसमा अहमद अतर (बेल्जियम) यांनाही विशेष कामगिरीवर असलेले दहशतवादी घोषीत केले आहे.
एक डझन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
अमेरिकी प्रशासनाने गेल्या महिन्यात सुमारे एक डझन दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल-बिनाली बहरीन याने गृहमंत्रालयात अधिकारी म्हणूनही काम केले आहे. 2014 मध्ये तो पहिल्यांदा इस्लामिक स्टेटच्या एका व्हिडिओमध्ये दिसला होता. ज्यात त्याने आपल्या समुदयाच्या लोकांना बंड करण्याबाबत अवाहन केले होते. अल-कुबैसीशी आर्थिक देवाण-घेवाण करणारी कंपनी अल-कवतारवरही गुरूवारी बंदीची कारवाई करण्यात आली. कुबैसी कंपनीने 2015-2016 या वर्षात इस्लामिक स्टेटसाठी 2.5 कोटी डॉलरचे आर्थिक पाठबळ सांभाळले होते.
वेगवेगळ्या नावांनी ओळख
अमेरिकेने अरमारविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यामुळे भारतही अरमारवर बंदी आणू शकतो. अरमार भारतातून आयसीसारख्या संघटनांसाठी युवकांची भर्ती करायचा. दहशतवाद्यांच्या दुनियेत अरमार छोटा मौला, अंजन भाई आणि युसूफ अल हिंदी या नावांनी ओळखला जायचा. दहशतवाद्यांविरुद्ध भारत सरकारने केलेल्या कारवाईनंतर अरमार मोठ्या भावाबरोबर पाकिस्तानला गेला. तिकडे त्याने अंसार उल तौहीद नावाची संघटना उभारली. यादरम्यान काही कालावधीनंतर तो दहशतवादी संघटना आयसीसशी जोडला गेला. आयसीसमध्ये सामील भारतीय युवकांना सामील करण्याची जबाबदारी घेतली. आयसीसशी सहानभूती बाळगणार्या अनेक युवकांना अरमारने संघटनेत सहभागी करुन घेतले. हे युवक हल्ल्याचे नियोजन, हत्यांरांची व्यवस्था करणे, नवीन युवकांना तयार करण्याचे काम करायचे.
कारण स्पष्ट नाही
अमेरिकेच्या वित्त मंत्रालयाने आपल्या प्रतिक्रियेत शफी अरमार तसेच इतर दहशतवाद्यांना नेमके कोणत्या कारणासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केले आहे, ते सांगितले नाही. सुरक्षा एजन्सीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका सरकारच्या प्रतिक्रीयेवरून दिसते की, शफी अरमार हा दहशतवादी संघटनांसाठी आर्थिक पाठबळ उभा करत असल्याच्या संशयावरून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असावी.