कर्नाटकची रस्सीखेच आता राजधानी दरबारी

0

नवी दिल्ली/ बंगळूर । कर्नाटकात काँग्रेस-निजद युती सरकार स्थापन होऊन आठवडा उलटला. मात्र मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावर अजूनही दोन्ही पक्षांचे घोडे अडले आहे. तसेच काँग्रेसमध्येही अंतर्गत एकमत झालेले नाही. त्यामुळे राज्यातील खातेवाटपाची रस्सीखेच आता देशाची राजधानी दिल्ली दरबारी पोहोचली आहे. दिल्लीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलामनबी आझाद यांच्या निवासस्थानी सोमवारी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी उपस्थित होते. तसेच काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निजदला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. आता दररोज अटी वाढत चालल्या आहेत, असे निजदचे म्हणणे आहे. अर्थ खात्यासह पाच प्रमुख खाती देण्याची मागणी काँग्रेस करत आहे. मात्र, निजदने ते मान्य केलेले नाही. मुख्यमंत्रिपदानंतर अर्थ खाते सर्वाधिक महत्त्वाचे आहे. निवडणुकीआधी जनतेला काही आश्‍वासने दिली आहेत. ती पूर्ण करावयाची असल्याने हे खाते देण्यास निजदने असमर्थता दर्शविली आहे. युती सरकार अस्तित्वात येण्यासाठी डी. के. शिवकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना मोठे पद देणे भाग आहे. काँग्रेस सरकार अस्तित्वात असताना त्यांनी ऊर्जा खाते सांभाळले होते. आता पुन्हा एकदा तेच खाते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद देण्याचा विचारही काँग्रेस वरिष्ठांचा असल्याचे समजते.

माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी पाटबंधारे, आर. व्ही. देशपांडे यांनी उद्योग खात्याची मागणी केली आहे. या दोन खात्यांसह सार्वजनिक बांधकाम खात्याची मागणीही काँग्रेसची आहे. मात्र, 2004 मध्ये काँग्रेस-निजद युती सरकार सत्तेवर असताना मुख्यमंत्रिपद वगळून उपमुख्यमंत्रिपदासह इतर प्रमुख खाती काँग्रेसला दिली होती. यावेळी प्रमुख खाती निजदला द्यावी, असा युक्तिवाद कुमारस्वामींनी केला आहे.
दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विदेश दौर्‍यावर गेले आहेत. त्यांच्या उपस्थितीत खातेवाटवर अंतिम निर्णय होणार आहे.

काँग्रेसचे संभाव्य मंत्री असे :
एस. आर. पाटील, आर. रामलिंगारेड्डी, एच. के. पाटील, के. जे. जॉर्ज, डी. के. शिवकुमार, आर. व्ही. देशपांडे, सतीश जारकी होळी, शामनूर शिवशंकरप्पा, एम. बी. पाटील, रघू आचार्य, रोशन बेग, रहिम खान, राजशेखर पाटील, शिवानंद पाटील, कृष्णबैरेगौडा, एम. कृष्णाप्पा, डॉ. सुधाकर, शिवशंकर रेड्डी, प्रियांक खर्गे, अजयसिंग, लक्ष्मी हेब्बाळकर, रूपा शशीधर, सी. एस. शिवळ्ळी, एम. टी. बी. नागराजू, तन्वीर सेठ, यु. टी. खादर, नागेंद्र, आनंद सिंग.