कर्नाटकमधील पोलीस सीबीआयपेक्षा प्रभावी

0

पुणे । कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ज्या पद्धतीने कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. ज्या वेगाने हा तपास झाला ते महत्त्वाचे आणि स्वागतार्ह आहे, असे मत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले. गौरी लंकेश यांच्या खुनाला 1 वर्ष होण्यापूर्वी कर्नाटक पोलिसांनी आरोपींचा तपास केला.

10-10 लाख रुपयांचे इनाम
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला येत्या 20 ऑगस्टला 5 वर्षे पूर्ण होतील. मात्र, वीरेंद्र तावडेला झालेल्या अटकेच्या पलिकडे अजूनही सारंग अकोलकर आणि विनय पवार हे आरोपी पकडले गेलेले नाही. त्यांच्या डोक्यावर 10-10 लाख रुपयांचे इनाम असूनही ते सापडलेले नाही. ही अस्वस्थ करणारी बाब असल्याचे सांगत हमीद दाभोलकर यांनी सीबीआयसारखी सर्वोच्च तपास संस्था डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करते. तर, दुसरीकडे गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास एका राज्याची तपास यंत्रणा करते. सीबीआयपेक्षा प्रभावी काम कर्नाटक पोलिसांनी केले. ही बाब सीबीआयसाठी लाजिरवाणी तसेच नाचक्की आणणारी असल्याची टीका त्यांनी केली.

कसून चौकशी करणे गरजेचे
महाराष्ट्र शासन आणि सीबीआयने गौरी लंकेश यांच्या खुनाच्या कटात जे लोक अटकेत आहेत त्या सगळ्यांची कसून चौकशी करणे गरजेचे आहे. स्वतंत्र विचार दडपण्यासाठी हे झालेले आहे. त्यामुळे त्यांचा तपास दहशतवादी हल्ल्याच्या गांभीर्याने केला पाहिजे, अशी मागणी आम्ही सातत्याने करतो आहोत. महाराष्ट्र शासन आणि सीबीआयला आता तरी जाग येईल आणि डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे मारेकरी पकडले जातील. त्यांच्या मागे असलेली पाळेमुळे खोदून काढली जातील, अशी अपेक्षा दाभोलकर यांनी व्यक्त केली.