कर्नाटकातील ट्रक क्लिनरचा जळगावात हृदयविकाराने मृत्यू

0

जळगाव: कर्नाटकातून आणलेला माल जळगावात खाली करून एका पेट्रोलपंपावर मुक्कामास थांबलेल्या कर्नाटकातील २६ वर्षीय ट्रक क्लिनर चा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. लंकेश अंबराया कोटारगी असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की गेल्या आठ दिवसांपासून लंकेशच्या छातीत दुखत होते. मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केले. त्रास होत असलेल्या अशाच परिस्थितीत तो क्लिनर म्हणुन कामावर असलेल्या ट्रान्सपोर्ट करणाऱ्या ट्रकच्या मालासोबतच जळगावात आला. जळगावात माल खाली केल्यानंतर दोन दिवसांनंतर पुन्हा येथून माल भरून कर्नाटकात घेऊन जायचे होते. यासाठी ट्रक चालकासह क्लिनर लंकेश हे दोघेही नेहमीप्रमाणेच जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील पटेल या पेट्रोलपंपावर मुक्कामास थांबले. शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक उलटी होऊन लंकेशच्या छातीत त्रास व्हायला लागला. त्यास ट्रकचालकासह पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात हलविले . रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास लंकेशची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस नाईक महेंद्र गायकवाड , समाधान टहाकळे यांनी रुग्णालय गाठले. व लंकेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. याबाबत लंकेशच्या कर्नाटकातील कुटुंबियांना माहिती देण्यात आली असून ते जळगावकडे येण्यास रवाना झाले आहेत. लंकेश यांच्या पश्चात दोन भाऊ आई वडील असा परिवार आहे याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ अजय सोनवणे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे .