कर्नाटक निवडणुकीचा बिगुल वाजला!

0

12 मेरोजी मतदान, तर 15 मेरोजी मतमोजणी

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक निवडणुकांची तारीख अखेर मंगळवारी जाहीर करण्यात आली. येत्या 12 मे या दिवशी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान घेण्यात येणार असून, त्यानंतर लगेच 15 मेरोजी मतमोजणी घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. आयोगाचे मुख्य आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषदेमध्ये कर्नाटक निवडणुकांसंबंधी सविस्तर माहिती दिली. येत्या मे महिन्यामध्ये कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होत असून, मे महिन्यामध्येच 224 विधानसभा जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार असल्याचे रावत यांनी सांगितले. तसेच ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, आयोगाची पत्रकार परिषद सुरू असताना, भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटद्वारे या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. यावरून मोठा वाद निर्माण झाला. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कारवाईचा इशाराही दिला आहे. त्यात आता काँग्रेसनेही भाजपवर टीकास्त्र सोडलेे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपला ’सुपर इलेक्शन कमिशन’ म्हणत निवडणुकांची तारीख आधीच घोषित करून भाजपने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेलाच आव्हान दिल्याची टीका केली.

इव्हीएमसह व्हीव्हीपॅटचाही वापर करणार
निवडणूक कार्यक्रमाबद्दल माहिती देताना, येत्या 17 एप्रिलला निवडणुकीसंबंधीची अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त रावत यांनी सांगितले. यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल व 24 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. यानंतर 12 मेला संपूर्ण राज्यामध्ये मतदान घेण्यात येणार असून, त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनीच म्हणजे 15 तारखेला मतमोजणी होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. याचबरोबर या निवडणुकांसाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार असल्याचे आयोगाने सांगितले. कर्नाटकात एकूण 4 कोटी 96 लाख मतदार असून, या सर्वांच्या सोयीसाठी आयोगाकडून यंदा विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदानादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे आयुक्त रावत यांनी स्पष्ट केले.

असा असेल निवडणूक कार्यक्रम
– 17 एप्रिल : निवडणुकीची अधिसूचना जारी होणार
– 24 एप्रिल : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
– 12 मे : राज्यातील 224 जागांसाठी होणार मतदान
– 15 मे : मतमोजणी व निकाल जाहीर करणार

आपल्याच सरकारला शहा एक नंबरचे भ्रष्टाचारी म्हणाले!
बेंगळुरू : निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहांची जीभ घसरली. सिद्धरामय्या सरकारऐवजी येदियुरप्पा सरकार एक नंबरचं भ्रष्टाचारी असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. शहांची ही फजिती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. शहा हे पत्रकार परिषदेमध्ये सिद्धरामय्या सरकारवर हल्लाबोल करत होते. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर काँग्रेस सरकारवर टीका करत असताना आपल्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे सरकार भ्रष्ट असल्याचे वक्तव्य केले. विशेष म्हणजे, येदियुरप्पा यावेळी स्वत: अमित शहांसोबत स्टेजवर उपस्थित होते. शहांच्या बाजूला बसलेल्या भाजप नेत्याने त्यांना तातडीने ही चूक निदर्शनास आणून दिली. काँग्रेसने ही संधी साधत भाजप आणि अमित शहांवर चांगलीच टोलेबाजी केली. ‘अमित शहा हे खरं बोलू शकतात हे कुणाला माहिती होते. अमित जी आम्ही तुमच्या वक्तव्याशी सहमत आहोत. भाजप आणि येदियुरप्पा सर्वात भ्रष्ट आहेत’ असे खोचक ट्विट काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी केले आहे.