कर्नाटक मुख्यमंत्री येडियुरप्पांचा राजीनामा

बंगळुरू : कर्नाटकात भाजपचा मोठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे आणि कर्नाटकचेमुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर मोठ्या कालावधीपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. राजीनामा देण्य़ापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे आजच त्यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत यांनी येडियुरप्पा यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी होत नाही तोवर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलं आहे. येडियुरप्पा यांच्या जागेवर आता मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठी कुणाला पसंती देतात? याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बसवराज बोम्मई, विश्वेश्वरा हेगडे कगेरी आणि केंद्रीय मंत्री कोळसा खणन मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांचं नाव चर्चेत आहे.

बसवराज बोम्मई हे लिंगायत समाजाचे असून सध्या कर्नाटक सरकारमध्ये गृहमंत्री पदावर आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत दुसरं नाव विश्वेश्वरा हेगडे कगेरी यांचं आहे. ते ब्राह्मण समाजाचे असून कर्नाटक विधानसभा अध्यक्ष आहेत. तर तिसरं नाव केंद्रीय कोळसा खणन मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांचं आहे.

विधानसभेत यादरम्यान येडियुरप्पा हे भावूक झाले. तसंच या दोन वर्षांच्या कार्यकाळात आपली सातत्यानं परीक्षा झाली असल्याचं म्हटलं. “ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा मला त्यांनी केंद्रात मंत्री बनण्यास सांगितलं होतं. परंतु मी त्यांना नकार दिला आणि कर्नाटकातच राहणार असल्याचं म्हटलं होतं,” असं येडियुरप्पा म्हणाले.