नवी दिल्ली: कर्नाटकातील राजकीय नाट्यावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती, काल निकाल राखून ठेवण्यात आला होता. दरम्यान आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा. यासाठी वेळेची मर्यादा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. याशिवाय, उद्या कर्नाटकच्या विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. यावेळी बंडखोर आमदारांनी विधानसभेत हजेरी लावावी किंवा नाही, हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे. त्यामुळे त्यांच्यावर बळजबरी केली जाऊ शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींच्या सरकारला जोरदार बसला दिला आहे. दरम्यान, उद्या कर्नाटकच्या विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून राजीनामा स्वीकारत नसल्याचा युक्तिवाद बंडखोर आमदारांनी केला. तर आमदारांच्या राजीनाम्यावर बुधवारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी न्यायालयाला सांगितले आहे.