कर्नाटक सरकारला एसटीची चपराक

0

पुणे । कर्नाटक सरकारने जय महाराष्ट्र घोषणेवर बंदी घातल्यानंतर पंधरा दिवसांच्या आतच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या लोगोमध्ये जय महाराष्ट्रचा समावेश करून, तो लोगो असलेली पहिली बस बेळगाव मार्गावर सोडली आहे. सीमा भागात जय महाराष्ट्र घोषणेवर घातलेली बंदी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना बेळगावात प्रवेश नाकारलेला प्रवेश या पार्श्‍वभूमीवर ते आता या पद्धतीने बेळगावात जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे.

बेळगावमध्ये जय महाराष्ट्र घोषणेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात आणि बेळगावमधील मराठी बांधवांनी त्यास कडाडून विरोध केला होता. त्यानंतर महाराष्ट्र एकिकरण समितीच्या वतीने बेळगावमध्ये निषेध मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चाला शिवसेना नेते दिवाकर रावते व अन्य सहकारी हजेरी लावणार होते. मात्र, बेळगावच्या जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना बेळगावमध्ये प्रवेश नाकारला होता. त्यामुळे ते मोर्चाला जाऊ शकले नाहीत. त्याचवेळी महाराष्ट्रात आलेल्या कर्नाटक एसटी महामंडळाच्या बसवर जय महाराष्ट्र लिहून शिवसेनेने त्यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते. याबाबत रावते यांना पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत विचारले असता, येत्या काळात एसटीच्या सर्वच बसवर जय महाराष्ट्र लिहिणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. अखेर एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनी महामंडळाचा नवीन लोगो प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये जय महाराष्ट्र व महाराष्ट्राचा भगवा नकाशा समाविष्ट करण्यात आला आहे. हा नवीन लोगो असलेली पहिली बस मुंबई-बेंगळुरू मार्गावर आज, शुक्रवारी सोडण्यात आली.