कर्नाटक सरकार अडचणीतच; कॉंग्रेसच्या बैठकीत १२ आमदारांची अनुपस्थिती

0

बंगळुरू: कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस सरकार संकटात सापडले आहे. काही आमदारांनी राजीनामे दिल्याने सरकार अल्पमतात आले आहे. दरम्यान या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस आमदारांची बैठक सुरू असून या बैठकीला 12 आमदारांनी दांडी मारली आहे. त्यापैकी 3 आमदारांनी आजारपणाचे कारण देत बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगितले. रामलिंगा रेड्डी, डॉ. सुधाकर, रोशन बेग, तुकाराम, अंजली निंबालकर, एमटीबी नागराज, संगमेश्वरा, शिवन्ना, फातिमा, बी. नागेंद्र, राज गौड़ा, रामाप्पा अशी गैरहजर असलेल्या आमदारांची नावे आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जनता दल (एस)च्या आमदारांनी राजीनामे देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सरकार वाचवण्यासाठी बंडखोरांना मंत्री करता यावे आणि भाजपाचा सरकार पाडण्याचा डाव उलटून लावावा, यासाठी दोन्ही पक्षांच्या सर्व आमदारांनी सोमवारी पदाचे राजीनामे दिले. मात्र, दोन अपक्ष मंत्री एच. नागेश व आर. शंकर यांनी राजीनाम्याबरोबरच कुमारस्वामी सरकारला दिलेला पाठिंबाही काढून घेतला. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीला 12 आमदारांची अनुपस्थिती आहे.

दरम्यान, आमदारांच्या राजीनामा नाट्यावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण, या आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभाध्यक्ष रमेश कुमार आज निर्णय घेणार आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांना आमदारांचे राजीनामे घेऊ नका, असे सांगितले आहे. तसेच, सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने आपल्या आमदारांची आज सकाळी साडे नऊ वाजता विधानसौदामध्ये बैठक बोलविली आहे.