15 दिवस आधीच आवक : 700 ते 800 रुपये डझन
पुणे : मार्केटयार्डातील फळविभागात मागील दोन दिवसांपासून कर्नाटक हापूसची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधीच आवक सुरू झाली असून, हुबळी, धारवाड आणि शिकारीपूर भागातून ही आवक होत आहे.
घाऊक बाजरात हापूसच्या डझनाला 700 ते 800 रुपये किलो भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरुवातीला हापूसला मिळालेले भाव स्थिर असल्याचे कर्नाटक आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले. कर्नाटक हापूसबरोबर बदाम, सुंदरी, लालबाग या जातीच्या आंब्याची आवक सुरू झाली आहे. कर्नाटक हापूसची 20 डझन, बदामची 350 ते 400 किलो आणि सुंदरीची 150 किलो आणि लालबागची 100 किलो अशी आवक झाली. कर्नाटक हापूसचा हंगाम एप्रिलमध्ये सुरू होतो. तोपर्यंत आता तुरळक आवक होणार आहे. कर्नाटकात यंदा आंबा उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे आंब्याचे उत्पादन चांगले होणार आहे. थंडी कमी होताच आवक वाढेल, असे उरसळ यांनी सांगितले.
कर्नाटकी आंब्यांचे भाव
कर्नाटक हापूस एक डझन- 700 ते 800 रु. किलो
सुंदरी-50 रुपये किलो
बदाम-70 ते 80 रु. किलो
लालबाग-60 ते 80 रु. किलो