कर्मचार्‍यांकडून पैशांची मागणी

0

अक्कलकुवा । अक्कलकुवा पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी विविध वैयक्तिक योजनांचा लाभ देताना येथील आदिवासी जनतेची पिळवणूक करून पैशांची मागणी करतात, अशी तक्रार आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तहसिलदार अक्कलकुवा यांच्याकडे केली आहे, अशी माहिती नागेश पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पंचायत समिती स्तरावर विविध योजनांच्या लाभ देण्यासाठी आदिवासी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात. त्यात गुरांचा गोठा, घरकुल आवास योजना, सिंचनविहीर योजना, बैलजोडी, बैलगाडी इत्यादींचा समावेश होता.

शिफारशीनुसार योजनेची अंमलबजावणी करा
अर्जांची छाननी करून मागेल त्याला गुरांचा गोठा, घरकुल योजना मिळणेकामी ऑनलाईन करणे ही योजना असताना तेथील भ्रष्ट अधिकार्यांकडून ठराविक लोकांचे चेहरे पाहून तथा खेडेगावातील काही दलाली कार्यकर्त्यांच्या शिफारशीनुसार सोयीनुसार सदर योजना पास करण्यात आल्या असून मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल करण्यात आली आहे. तसेच गुरांचा गोठा बांधण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याकडून 5000 रूपये प्रमाणे पैसे घेऊन हजारोच्या संख्येने आदेश काढण्यात आले. परंतु मस्टर काढण्याच्या वेळी एका ग्रामपंचायतीला फक्त 5 लाभार्थ्यांचे मस्टर काढण्यात आले असून फक्त 5 मस्टर अंतीम केल्याशिवाय बिल अदा झाल्याशिवाय पुढील मस्टर काढता येणार नाही, असा नियम का लादण्यात आला.

शासनाचे प्रशासकीय अधिकारी जबाबदार
योजनेत लाभार्थी निवड करतांना कोणत्याही प्रकारची मर्यादा नसताना अधिकारी 5000 रूपये घेऊनही चालढकल का करत आहेत. घरकुल ऑनलाइृन करणेकामी ज्या लाभार्थ्यांनी 2000 रूपये दिलेत त्यांचे हमखास घरकुलपास होतात. ही बाब अतिशय निंदनीय असून यासाठी शासनाचे प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत. आदिवासी लाभार्थी हा अशिक्षित असून त्याचा गैरफायदा अधिकारी घेतात व काही दलाल व अधिकारी लुटमार करतात तरी सदर झालेल्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन देऊन लागलीच त्यांनी पत्रकार परिषद बोलावून तेथील गटविकास अधिकारी यांच्याविषयी नाराजी व्यक्त करून अक्कलकुवा पंचायत समिती म्हणजे मिनाबाजार आहे काय ? असे आदिवासी एकता परिषदेचे नागेश पाडवी यांनी सांगितले.

तहसिलदार यांना दिले निवेदन
त्यांनी तहसिलदार यांनी दिलेल्या निवेदनावर नागेश पाडवी, जगदीश वसावे, हिरालाल वसावे, विजेसिंग वसावे, प्रमोद ठाकरे, दिलीप पाउवी, रमेश नाईक, रमेश पाडवी, दिलवरसिंग पाडवी, भरत पाडवी, रणजित पाडवी, जेका पाडवी, नानसिंग तडवी, निलेश पाडवी, काथा वसावे, अशोक पाडवी आदी आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या सह्या असून पुढील कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडेही प्रत रवाना केली असल्याबाबत नागेश पाडवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.