कर्मचार्‍यांचा थकित पगार न मिळाल्यास संपावर जाण्याचा इशारा

0

बोदवड। नोव्हेंबर 2016 पासून पगार थकल्याने आर्थिक कोंडी झालेल्या येथील नगरपंचायत कर्मचार्‍यांनी 11 जुलैपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोबत आकृतीबंद तयार करून कर्मचार्‍यांना त्यात सामावून घ्यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

बोदवड नगरपंचायतीची स्थापना होवून वर्ष पूर्ण झाले. मात्र, अद्यापही येथील कर्मचार्‍यांच्या तक्रारी पूर्णपणे सुटलेल्या नाहीत. त्यामुळे जळगाव जिल्हा नगरपालिका मजदूर संघाचे तालुकाध्यक्ष तुळशिराम तायडे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कर्मचार्‍यांची बैठक झाली. त्यात प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय झाला. प्रमुख मागण्यांमध्ये सर्व कर्मचार्‍यांना नगरपंचायत सेवेत सामावून घेत आस्थापना आकृतीबंध त्वरित मंजूर करून समायोजनासाठी वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव देणे नियमानुसार वेतन अदा करणे, सर्व कायम कर्मचार्‍यांना मार्च 2016चे पगार अदा करणे (सध्या 2014 प्रमाणे पगार होतात), नोव्हेंबर 2016 ते जून 2017 या आठ महिन्यांचा थकीत पगार देणे, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना पीएफ ग्रॅच्युईटी देणे, कर्मचार्‍यांना विमा संरक्षण आदींचा समावेश आहे. संघटनेचे सरचिटणीस उमेश गुरव, कोषाध्यक्ष अर्जुन सारवान, संघटन मंत्री रज्जू सारवान, मनोज छपरीबंद, संजय काटे, विजय अग्रवाल उपस्थित होते.