जळगाव । किराणा दुकानावर काम करणारे कामगार व दुकानाचा मालक यांच्यात चांगले संबंध कसे असतात हे आज झालेल्या ऋणानुबंध सन्मान सोहळा कार्यक्रमात दिसून आले. आपल्या दुकानात काम करणारे कामगार यांचा सन्मान होणे ही अलौकीक, गौरवाची गोष्ट आहे. ही महाराष्ट्रातील पाहिला कार्यक्रम असल्यामुळे मुद्दाम या सन्मान सोहळ्यात हजेरी लावली असल्याचे प्रतिपादन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. एकता रिटेल किराणा मर्चंट्स नागरी पतसंस्थेतर्फे आयोजित केलेल्या ‘ऋणानुबंध सन्मान सोहळा’कार्यक्रमात जळगाव शहरात कोणत्याही किराणा दुकानात सलग 10 वर्षे सेवा देणार्या कर्मचार्यांच्या जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व पद्मश्री विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते कर्मचार्यांचा सन्मान यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
कर्मचार्यांना बोनस देण्याचा अॅड. निकम यांचा सल्ला
ग्राहक हा व्यवसाय करणार्याचा देवता असतो. त्या ग्राहकाला पुन्हा आपल्याकडे येण्याचे चांगले संबंध दुकान मालकांऐवजी दुकानात काम करणारे कामगार उत्तम सेवा देतात. कामगार हा मालक आणि ग्राहक यांच्यातील दुवा असतो. मालकाचा व्यवसायात वृद्धी होते ते कामगारामुळे त्यामुळे प्रत्येक दुकानदार मालकाने कामावर असलेल्या कामगाराला यावर्षी चांगला बोनस द्या, असा सल्ला अॅड. उज्ज्वल निकम यांनी उपस्थित असलेल्या व्यापारी व दुकान मालकांना दिला. यावेळी या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ललीत बरडीया, उपाध्यक्ष घनशाम अडवाणी, व्यवस्थापक प्रविण कोतकर आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना सोबत काम करणार्या कर्मचार्याविषयी बोलत असतांना ललीत बरडीया भावूक झाले होते.
उपक्रमांचे केले कौतूक
एकता रिटेल किराणा मर्चंट्स नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतिने या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव शहरात कोणत्याही किराणा दुकानात सलग 10 वर्षे सेवा देणार्या 60 कर्मचार्यांचा स्मृतीचिन्ह, भेटवस्तू आणि आपल्या परीसरात स्वच्छता राखण्यासाठी डस्टबीन देण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना एकता रिटेल किराणा मर्चंट्स नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडिया व उपाध्यक्ष धनशामदास अडवाणी यांची असल्यामुळे प्रमुख अतिथींनी या कार्यक्रमाचे कौतूक केले.
सभासदांना 15 टक्के लाभांश घोषित
एकता रिटेल किराणा मर्चंट पतसंस्थेतर्फे सभासदांना 15 टक्के लाभांश घोषित करीत सभासदांच्या बोन डेन्सिटीची मोफत तपासणी करण्याची घोषणा आज संस्थेच्या 15 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. ही सभा जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष ललीत बरडीया यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात झाली. सभेच्या प्रारंभी शोकप्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता कोलते यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा सादर केला. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे क्रमवार वाचन करुन त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विषयांचे वाचन अध्यक्ष ललीत बरडीया, उपाध्यक्ष घनशाम अडवाणी, व्यवस्थापक प्रविण कोतकर, राधिका देसाई, हर्षा कुळकर्णी, किरण माहेश्वरी यांनी केले. सभासदांनी त्यास एकमताने मंजुरी दिली. सभासदांच्या हाडांचा ठिसूळपणा (बोन डेन्सिटी) तपासणी अस्थिरोग तज्ञ डॉ. राजेंद्र अग्रवाल हे मोफत करणार आहेत. यासाठी संस्थेकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल असेही यावेळी सांगण्यात आले