भुसावळ । राज्यभरातील पालिका व नगरपालिकेतील कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांप्रमाणे 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी पालिकेच्या सर्व कर्मचार्यांनी बुधवारी सकाळी पालिकेच्या आवारात कामबंद आंदोलन केल्याने पालिकेचे कामकाज आज दिवसभरासाठी ठप्प पडले शिवाय शहरात कुठेही स्वच्छता झाली नाही. पालिका दवाखान्यासह अग्निशमन विभागाची सेवा सुरळीत होती.
अशा आहेत कर्मचार्यांच्या मागण्या
राज्य संवर्ग निर्मिती होवून दहा वर्षांचा कालावधी लोटला तरी सेवानिवृत्ती वेतन अंशदान, रजा अंशदानाचा भरणा झालेला नाही तत्काळ करावा, राज्य संवर्ग कर्मचार्यांच्या सेवाज्येष्ठता यादी व पदोन्नतीसाठीचा सेवा काळ हा समावेशनाच्या दिनांकापासून धरण्यात यावा, अभियांत्रिकी सेवा संवर्गातील कर्मचार्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वेतन श्रेणी लागू करावी, नगरपरिषद कर्मचार्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके शासकीय कर्मचार्यांप्रमाणे लागू करावीत, अनुकंपा धारकांची नियुक्तीची प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, नगरपरिषदेतील कंत्राटी पद्धत्ती, ठेका पद्धत्ती बंद करावी, राज्यातील ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचार्यांचे नगर पंचायतीमध्ये समावेशन करावे तसेच वेतनासाठी शंभर टक्के अनुदान द्यावे या मागण्यांचा समावेश आहे.
370 कर्मचारी रजेवर
महिला कर्मचारी व अधिकारी यांना बालसंगोपन रजा देण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर तसेच प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले. बुधवारच्या आंदोलनात पालिकेतील 370 कर्मचारी रजेवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी सकाळी कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांच्यासह न.पा.कर्मचारी वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू खरारे व कर्मचारी सामूहिक रजा आंदोलनात सहभागी झाले.