कर्मचार्‍यांच्या वसाहतींची दूरवस्था

0

पुणे । महापालिकेचे कर्मचारी राहत असलेल्या वसाहतींची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत वेळीच निर्णय घ्यावा, अशी मागणी सभासदांनी सर्वसाधारण सभेत गुरुवारी केली. याबाबत चार दिवसात बैठक बोलवून निर्णय घेण्याचे आश्‍वासन आयुक्त कुणालकुमार यांनी दिले.

दुर्घटना होण्याची शक्यता
महापालिकेत काम करणार्‍या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी राहत असलेल्या वसाहतींची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वर्षापासून पुनर्विकासाची मागणी करण्यात येत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. तेथे कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे कर्मचार्‍यांना जीव मुठीत धरून दिवस काढावे लागत असल्याचे भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्याबाबत सभेत प्रश्न उपस्थित केला.

…तर मनुष्यवधाचा गुन्हा
महापालिकेच्या अधिकार्‍यांनी एक दिवस या वसाहतींमध्ये राहून बघावे, असे घाटे यांनी यावेळी सांगितले. अनेक वर्षांमध्ये या वसाहतींचा पुनर्विकास झालेला नसून दुर्घटना घडल्यास मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा लागेल. याकडे त्यांनी लक्ष वेधले. काँग्रेसचे सभासद अजित दरेकर यांनी 7, 8 क्रमांकाच्या वसाहतींची दूरवस्था झाल्याचे सांगितले. या विषयाकडे गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

महापौर बोलावणार बैठक
याबाबत दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली असल्याचे आयुक्त कुणालकुणार यांनी सांगितले. संबंधित ठिकाणी क्षेत्रभेट देऊन परिस्थिती बघणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर 3-4 दिवसात निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौर मुक्ता टिळक यांनीही पुढील आठवड्यात अधिकार्‍यांसह महापौर दालनात बैठक बोलावणार असल्याचे जाहीर केले. यावेळी संबधित सभासदांना बोलावले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.