कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार

0

फैजपूर। जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेसाठी जनसामान्य तथा समाजप्रिय व्यक्तिंशी सुसंवाद साधून तसेच पोलीस कर्मचार्‍यांच्या अडीअडचणी व समस्यांचा आढावा घेवून कायद्याचे कठोर पालन करणार असल्याचे नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस उपअधिक्षक बच्चनसिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले. त्यांनी येथील पोलीस स्टेशनला 10 रोजी धावती भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला असता कामजाबाबत समाधान व्यक्त केेले.

कायद्याचे कठोर पालन करणार
बच्चनसिंह यांनी येथील प्रत्येक पोलीस कर्मचार्‍याची ओळख परिचय करुन प्रत्येकाच्या वैयक्तिक समस्या जाणून घेतल्या. पोलिसांच्या बदल्या, निवासस्थानाचा प्रश्‍न यावर चर्चा करुन प्रत्येकाने आपले काम चोखपणे बजावणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. बच्चनसिंह यांचे गुलाबपुष्प देवून फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग, एपीआय सार्थक नेहेते यांनी स्वागत केले. यावेळी पीएसआय मनोहर मोरे, आधार निकुंभे, रामलाल साठे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याचे कठोर पालन केले जाईल. यासाठी जनता व पत्रकारांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पत्रकारांनीही त्यांचे स्वागत केले.