कर्मचार्‍यांना नियमांचे उल्लंघन पडणार महागात

0

नेरुळ । नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कर्मचार्‍यांच्या गैरहजेरी आणि कर्तव्याचे पालन होत नसल्याने बस सेवेवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नात देखील घट होत असून हे टाळण्यासाठी परिवहन प्रशासनाने जानेवारी महिन्यापासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक परिवहन प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरात आणि शहराबाहेर नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बसचे जाळे पसरलेले आहे. परिवहन उपक्रमाकडून होणार्‍या चुकांमुळे गेल्यावर्षापर्यंत हे बसमार्ग प्रति किलोमीटर 43 रुपये तोट्यात होते पालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परिवहन उपक्रमाला होणारा तोटा भरून काढण्यासाठी आयटीएस प्रणाली, ई तिकिटिंग, पूर्णपणे तोट्यात असणारे मार्ग बंद करणे, सतत गैरहजार राहणार्‍या कर्मचाऱयांवर कारवाई असे विविध बदल करून प्रति किलोमीटर 18 रुपये तोट्यापर्यंत आणले होते. त्यानंतर हाच तोटा आणखी कमी करत परिवहन उपक्रम सध्या प्रतिकिलोमीटर 12 रुपये तोट्यापर्यंत पोहचला आहे. परिवहन प्रशासकडून हा तोटा भरून काढण्यासाठी नवीन वर्षात नियमाचे पालन न करणार्‍या कर्मचार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. परिवहन उपक्रमाचे तुर्भे, आसुडगाव व घणसोली आगार आहेत.

या ठिकाणी काम करणारे आस्थापनेवरील, रोजंदारी, आणि ठोक मानधनावर काम करणार्‍या चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, सहायक वाहतूक निरीक्षक, मॅकेनिक, मदतनीस, अभियंता, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक यांच्याकडून राजा मंजूर न करता गैरहजर राहणे, बस थांब्यावर बस थांबविणे, बसचा मार्गदर्शक फलक चुकीचा लावणे अथवा बंद ठेवणे, बस जाणून बुजून नादुरुस्त करणे, अर्ध फेरी मारणे याबाबतचे प्रमाण वाढले होते. तसेच अभियांत्रिकी विभागातून उपलब्ध करून दिलेल्या बस मार्गावर जाऊन ना दुरुस्त होत असल्याने मार्गावरील फेर्‍या रद्द होणे अशा कारणांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. परिणामी परिवहन उपक्रमाला मोठा तोटा देखील सहन करावा लागत आहे. आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी 500 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.