विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे आयुक्तांना पत्र
पिंपरी चिंचवड : शास्तीकर व मिळकत वसुली निर्धारीत उद्दिष्ट वसुली न केल्याने महापालिकेच्या करसंकलन विभागातील 88 कर्मचार्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई कर्मचार्यांवरच न करता त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार्या संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र देण्यात आले आहे.
आमदार, खासदारांकडून कर न भरण्याचे आवाहन…
पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या करसंकलन विभागातील वर्ग तीनच्या कर्मचार्यांना शास्तीकर व मिळकत वसुली निर्धारीत उद्दीष्ट देण्यात आले होते. वसूली न केल्यामुळे नोटीसा बजावून खुलासा मागविण्यात आला होता. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा नसल्याने त्या कर्मचार्यांस वसूलीचे कामकाजामध्ये निष्काळजीपणा आणि कर्तव्यात हयगय केल्याने एक वेतनवाढ स्थगिती,250 रुपये दंडात्मक कारवाई करुन त्यांची नोंद संबंधित कर्मचार्यांंच्या सेवा नोंद पुस्तकात घेण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. शास्तीकराचा प्रश्न राज्य सरकार पातळीवर प्रलंबित आहे. चार वर्षापासून राज्य सरकार शास्तीकर माफ करण्याचे आश्वासने देत आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पदाधिकारी, आमदार व खासदार शास्तीकर भरु नका, असे नागरीकांना वेळोवेळी आवाहन करीत आहेत. त्यामुळे शहरातील नागरीक शास्तीकर भरत नाहीत. गेली चार वर्षापासून शास्तीकरासह मिळकत कर भरणे अनिवार्य केले होते. त्यापूर्वी फक्त मिळकत कर भरुन घेतला जात आहे. यामुळे नागरीक शास्तीकर माफ होईल, या आशेने शास्तीकर भरत नाहीत. शास्तीकर भरला तरच मिळकत कर भरुन घेतला जातो, असे शास्तीकर वगळता फक्त मिळकत कर भरुन घेतला जात नव्हता. त्यामुळे नागरीकांनी मिळकत करही भरलेला नाही, असे पत्रात नमूद आहे.
कर्मचार्यांवर अन्याय होईल…
दंडात्मक कारवाई केलेल्या कर्मचार्यांमध्ये काही कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र आहेत. तर काही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवानोंद पुस्तकात दंडाची नोंद केल्यामुळे त्यांच्या पदोन्नती व पेन्शनवर परीणाम होऊ शकतो. तसेच दंडात्मक वसुलीची कारवाई फक्त वर्ग तीनच्याच कर्मचा-यांवर करण्यात आली आहे. यासाठी फक्त वर्ग तीनचेच कर्मचारी जबाबदार आहेत काय? यांच्यावर नियत्रंण ठेवणारे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, संबंधित प्रशासन अधिकारी यानांही जबाबदार धरण्यात यावे, त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे. तसेच शास्तीकर व मिळकत कर वसूली करण्यांमध्ये वर्ग तीनच्या कर्मचार्यांची चूक झालेली नाही. त्यांनी नेमून दिलेली कामे केलेली आहेत. ज्या कर्मचार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांची नोंद सेवानोंद पुस्तकात घेण्यात येऊ नये. तसेच वेतनवाढ स्थगितीची कारवाई करण्यात येऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.