कर्मदरिद्री सरकारचा फुसका अर्थसंकल्प : आ. गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

ही तर आकड्यांची फेकमफाक; कसली पंचसूत्री ? भ्रष्टाचार हाच यांचा एकसूत्री कार्यक्रम

 

जळगाव-प्रतिनिधी | महाविकास आघाडी सरकारने राज्याचा बट्टयाबोळ केला असून आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याचेच प्रतिबिंब उमटले असल्याची घणाघाती टीका माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केली आहे. सर्वच आघाड्यांवर सरकार फसले असून निव्वळ आकड्यांची फेकमफाक करत बजेट सादर करण्यात आल्याचा टोला त्यांनी मारला आहे. तर अर्थमंत्र्यांनी विकासाची नव्हे तर जनतेला भकास करण्याची पंचसूत्री मांडली असून या सरकारचा एकसूत्री कार्यक्रम भ्रष्टाचार हाच असल्याची घणाघाती टीका देखील त्यांनी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर आ. गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी विकासाची पंचसुत्री मांडल्याचा दावा केला असला तरी विकासाचे एक सूत्रदेखील पूर्ण करू न शकणार्‍यांनी पंचसुत्री मांडणे हा सर्वात मोठा विनोद आहे. या सरकारने भ्रष्टाचाराशिवाय काहीही केलेले नाही. आणि आता बजेटमधून जनहिताचा आव आणला जात असल्याची टीका त्यांनी केली.

या सरकारने शेतीसाठी भरीव तरतूद करण्याऐवजी केवळ आपण शेतकरी हिताचे तारणहार असल्याचा आव आणण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमाफी, जलयुक्त शिवार, समृध्दी महामार्ग आदींसारख्या महत्वाच्या बाबी पूर्ण केल्या असतांना या सरकारने मात्र जनहिताला पूर्णपणे हरताळ फासल्याची टीका त्यांनी केली आहे.

आ. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, कोविड नंतरच्या काळात आरोग्याला प्राधान्य हवे असतांना आधीच्याच सरकारच्या काही निर्णयांना नव्याने रंग चढवून सादर करण्यात आले आहे. यात आरोग्य सेवांच्या बळकटीकरणाबाबत शब्द देखील उच्चारण्यात आलेला नाही. हीच बाब अन्य निर्णयांच्या माध्यमातूनही दिसून आली आहे. विविध मागास समाजघटकांना अपूर्ण निधी देण्यात आला असून राज्यातील अतिशय ज्वलंत असणार्‍या वीज बिलांबाबत ठोस निर्णय घेण्यात न आल्याचा सरळ मोठा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. यामुळे हे सरकार फक्त आणि फक्त भ्रष्टाचारात अग्रेसर असून यांना विकासाशी आणि सर्वसामान्यांशी काहीही देणेघेणे नाही. यात खान्देश, मराठवाडा, विदर्भ आदी भागांना काहीही मिळाले नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.