पुणे ः रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मराठी विभाग व विद्यार्थी मंच आयोजित आंतर महाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेचा ‘कर्मवीर फिरता करंडक’ सी.के. गोयाल महाविद्यालयाने पटकवला. या स्पर्धेत पुणे शहर व परिसरातील 22 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. ट्रान्स जेन्डर, जागर स्त्रीशक्तीचा, संविधानाचे सामर्थ्य, व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण, लैंगिक अत्याचार, भूक बळी, भ्रष्टाचार, युवाशक्तीचे सामर्थ्य अशा विविध सामाजिक विषयांवर या संघांनी पथनाट्य सादर केली.
पथनाट्य स्पर्धेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागीय, समन्वयक समिती सदस्या सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते व विभागीय अध्यक्ष मा.अँड.राम कांडगे यांच्या उपस्थितीत पार पडले. प्रथम क्रमांकाचा ‘कर्मवीर फिरता करंडक’ सी.के.गोयल महाविद्यालय, दापोडी (रु.5000), द्वितीय क्रमांक महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी (रु.3000 व सन्मानचिन्ह), तृतीय क्रमांक एस. एम.सी.सी.कॉलेज (रु.2000 व सन्मानचिन्ह), उत्तेजनार्थ संघवी केशरी कॉलेज (1000 व सन्मानचिन्ह), बालाजी लॉ कॉलेज (उत्कृष्ट संहिता – कशासाठी पोटासाठी), उत्कृष्ट कलावंत पुरुषपात्र-अबिर तिवारी, स्त्रीपात्र अमिषा सोंडे, आदी कलावंत व महाविद्यालयांनी पारितोषिके मिळविली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.राजेंद्र थोरात, डॉ.निशा भंडारे, डॉ.सविता पाटील यांनी काम पाहिले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी पुढील वर्षी यापेक्षा भव्यदिव्य स्पर्धा आयोजित करणार असल्याचे सांगून, विजेत्या संघांनी व ज्यांना पारितोषिके मिळाले नाहीत त्यांनी खचून न जाता स्पर्धेत सहभागी होण्याचे आव्हान केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कार्याध्यक्ष व उपप्राचार्य डॉ.संजय नगरकर, विद्यार्थी मंचचे समन्वयक सूर्यकांत सरवदे व इतर सर्व सदस्य, मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. या स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ.संजय नगरकर, प्रा.बी एस पाटील, डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. रमेश रणदिवे, डॉ. तानाजी हातेकर, प्रा.एकनाथ झावरे, डॉ. शशी कराळे, डॉ. अतुल चौरे, अक्षय होळकर व आकाश टेंभुर्णीकर यांनी रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह प्रायोजित केली. प्रायोजित रकमेतून मिळालेल्या निधीतील शिल्लक निधीतून विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशनवरील अनाथांना जेवणाची पाकिटे देऊन सामाजिक बांधिलकी जपली. विद्यार्थ्यांच्या या कामाबद्दल प्राचार्यांचे त्यांचे अभिनंदन केले.