जळगाव । कर्मवीर भाऊराव पाटील खर्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील आधुनिक भगीरथ होते. त्यांनी खेड्यापाड्यातील गरीब, होतकरू व मागासवर्गीय परिवारातील मुला-मुलींना शिक्षणासारख्या अत्यावश्यक गोष्टीशी जोडले. स्वावलंबी बनविण्यासाठी नव-नवीन प्रयोग केलेत. महाराष्ट्रातील किती तरी यशस्वी माणसे त्यांनी निर्मिलेल्या वसतिगृहातून व रयत शिक्षण संस्थेतून शिकलेली आहेत. त्यांच्या नंतरही या संस्थामधील पिढ्यांनी तो वसापुढे चालविला. शिक्षण क्षेत्रात समता व बंधुतेला कर्माविरांमुळे वेगळी विकासात्मक दिशा मिळाली. असे विचार कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.सुरेश तायडे यांनी मुळजी जेठा महाविद्यालयात राबविण्यात येणार्या कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेच्या वतीने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी कमवा व शिका योजनेतील काही मुला-मुलींनी सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन आणि कार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमवा व शिका योजनेचे समन्वयक सागर बडगे सर यांनी केले तसेच आभर प्रदर्शन विद्यार्थी तुषार सूर्यवंशी याने केले. यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.जुगलकिशोर दुबे, डॉ.सी.पी.लभाणे, प्रा.देवेंद्र इंगळे, प्रा.के.के.वळवी, प्रा. हिंगोणेकर, प्रा.जेसा पाडवी, प्रा. विजय लोहार प्रा. सुहास तायडे प्राध्यापक आणि 90 विद्यार्थी उपस्थित होते.