कर्वे रस्त्यावर मेट्रोचा मार्ग मोकळा

0

‘एसआरए’च्या जागेत कामास परवानगी; पौड रस्ता ते कर्वे रस्त्याला जोडणार्‍या 600 मीटरच्या मार्ग

पुणे : पौड रस्ता ते कर्वे रस्त्याला जोडणार्‍या सुमारे 600 मीटरच्या मेट्रो मार्गाच्या कामाचा तिढा अखेर सुटला आहे. पौड रस्त्यावरून ज्या ठिकाणी हा मार्ग कर्वे रस्त्यावर जोडला जातो. त्या ठिकाणची डाव्या बाजूला ‘एसआरए’च्या जागेत काम करण्यास महामेट्रोस ‘एसआरए’ने परवानगी दिली आहे. तसेच एका खासगी बांधकाम व्यावसायिकानेही परवानगी दिल्याची माहिती या मार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी दिली. या मार्गात मेट्रोचे सुमारे 15 खांब असून त्यांचे काम अजून सुरू झालेले नव्हते. प्रामुख्याने या भागात सुमारे 22 ते 25 निवासी तसेच काही व्यावसायिक मिळकती आहेत.

‘एसआरए’मध्ये पुनर्वसन

सर्व मिळकती खांबाच्या कामात अडथळा ठरणार्‍या आहेत. या मिळकतींचे ‘एसआरए’मध्ये पुनर्वसन होणार असून याच भागात मागील बाजूस ही जागा आहे. त्यामुळे या भागातील मिळकती ‘एसआरए’च्या मागील जागेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यास ‘एसआरए’ने मान्यता दिलेली असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

वनाझ ते धान्य गोदाम मार्ग

या मार्गातील काही खांब एका खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या जागेतून जात आहेत. त्यांनीही त्यास मान्यता दिलेली असल्याचेही गाडगीळ यांनी स्पष्ट केले. महामेट्रोकडून वनाज ते धान्य गोदाम या मार्गात केवळ हा 500 ते 600 मीटरच्या भागात या जागेबाबत निर्णय होत नसल्याने काम सुरू करण्यात आले नव्हते. मात्र, आता परवानगी मिळाल्याने तातडीने हे काम सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एक ते दीड वर्षे काम

त्यामुळे वाहतूक सुरळीत होत असल्याने वाहतूक पोलिसांकडून या बदलाचे स्वागत करण्यात आले आहे. या मार्गात दुहेरी उड्डाणपुलासाठी सुमारे 13 खांब येणार असून त्यातील सहा खांबाचे कामही सुरू करण्यात आले असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील एक ते दीड वर्षे हे काम सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.

वाहतूक बदलाबाबत समाधान

कर्वेरस्त्यावर एसएनडीटी महाविद्यालय ते अभिनव चौकापर्यंत उभारण्यात येणार्‍या दुमजली उड्डाणपुलासाठी कर्वे रस्त्यावरील करण्यात आलेल्या वाहतूक बदलाबाबत वाहतूक पोलीस समाधानी असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. हे बदल करताना, कर्वे रस्त्यावर केवळ जड वाहनांना सरळ जाण्यास मुभा देण्यात आली असून हलकी वाहने आठवले चौकातून चक्राकार वाहतूकीद्वारे अभिनव चौकात जात आहेत.