भुसावळ। केंद्र शासनाच्या गुणवत्ता परिषदेच्या पथकाद्वारे हागणदारीमुक्तीसंदर्भात गेल्या महिन्यात शहरातील नऊ ठिकाणी शौचालयांची पाहणी करण्यात आली होती. या पथकाने सादर केलेल्या अहवालानुसार भुसावळ शहर हागणदारीमुक्त झाले असल्याचे दिल्ली येथील केंद्रीय समितीने बुधवारी जाहीर केले आहे. यामुळे देशातील दुसर्या क्रमांकाचे अस्वच्छ शहर असल्याचा कलंक काहीसा पुसला गेला आहे.
शहरात कर्मचार्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरसेवकांनीदेखील उत्स्फूर्त भाग घेतला. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली. वैयक्तिक शौचालय बांधकामाबद्दल जागृती करण्यात आली. शहराचे नाव उंचावले आहे.
रमण भोळे, नगराध्यक्ष
विविध वर्गवारीत पाहणी
केंद्रीय पथकाने झोपडपट्टी भाग भारतनगर, पंचशीलनगर तर रहिवाशी भाग चक्रधरनगर, तापीनगर व छत्रपती शिवाजी संकुल, छबीलदास चौधरी संकुल, बी.झेड. हायस्कूल, म्युनिसीपल हायस्कूल तसेच विशेष स्थळांमध्ये रेल्वेस्टेशन परिसर अशा नऊ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची पाहणी करण्यात आली.
जागृतीवर भर
दोन महिन्यांपूर्वी देशभरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भुसावळ शहर देशातील दुसर्या क्रमांकाचे अस्वच्छ शहर असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानंतर पालिकेतील सत्ताधार्यांवर चहुबाजूंनी टिकेचा भडीमार होताच शहर स्वच्छतेसाठी सत्ताधार्यांनी कंबर कसली होती.