कलबुर्गींनंतर गौरी

0

5 सप्टेंबर हा दिवस माध्यमांसाठी अस्वस्थ करणारा ठरला. बंगळुरूतील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या राजराजेश्‍वरी येथील निवासस्थानी मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्या लंकेश पत्रिका नावाचे वर्तमानपत्र चालवत होत्या. त्यांनी केंद्रातील सत्ताधार्‍यांचा खोटारडेपणा वेळोवेळी आपल्या वर्तमानपत्रातून उघड केला. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या धार्मिक संघटनेची सोशल मीडियावरील हातचलाखीसुद्धा उघड केली. केंद्रातील काही मंत्र्यांनी लोकांना उल्लू बनवण्यासाठी कोणकोणते उपद्व्याप केले हे त्यांनी लंकेश पत्रिकामधून मांडले. गौरी अशा प्रवृत्तींना आपल्या वर्तमानपत्रातून ठेचून काढत होत्या. त्यामुळेच त्यांची अशी निर्घृण हत्या करण्यात आली असावी? 2015 मध्ये कर्नाटकमध्ये अशाचप्रकारे विरोधातील विचारांना संपवण्यासाठी डॉ. एम. एस. कलबुर्गी यांची हत्या केली गेली.

विशेष म्हणजे कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये पोलिसांना काही साम्यही आढळून आले आहे. 2008 मध्ये गौरी यांनी त्यांच्या वृत्तपत्रात छापलेल्या एका लेखामुळे त्यांच्यावर खटला दाखल झाला होता. या मानहानीच्या प्रकरणात त्यांना सहा महिन्यांची शिक्षादेखील सुनावण्यात आली. परंतु, त्यांना जामीन मिळाला होता. धारवाड येथील एक भाजप खासदार आणि एका नेत्याने हा खटला लंकेश यांच्यावर गुदारला होता. एक महिला जेव्हा चंडिकेचे रूप घेते तेव्हा तिला कसे संपवले जाते, हे गौरी यांच्या हत्येमुळे पुन्हा एकवेळ स्पष्ट झाले आहे. आमच्या विरोधात कुणीही काहीही बोलायचे नाही. आम्ही काहीही केले तरी तुमची तोंडे आणि लेखणी बंद ठेवायची किंवा आमची फक्त स्तुती करायची, अशी हुकूमशाही प्रवृत्ती सध्या भारतीय राजकारणात बोकाळली आहे. या कुप्रवृत्तीबाबत समाजाला तूर्त तरी दाहकता जाणवत नाही. ज्यावेळी समाजाला त्याची झळ बसेल त्यावेळी खूपच उशीर झालेला असेल. लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. अशा दु:खद विषयावरही काही भाटांनी वेगळ्या पद्धतीने म्हणजेच त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तींचा उदोउदो करत आनंद साजरा केला. अशाप्रकारची भयंकर विकृती राजाश्रयाखाली आज फोफावत आहे.

या विषारी विचारांना वेळीच आवर घातला नाही तर त्यांना उघडपणे राजाश्रय मिळू शकतो. गौरी यांची हत्या करून त्यांचे विचार संपवले असे कुणालाही वाटत असेल किंवा समस्त माध्यमांमध्ये दहशत निर्माण केल्याने आपले उद्योग सहज यशस्वी होतील, असे कुणास वाटत असेल तर तो निव्वळ मुर्खपणा आहे. असे कदापि होणार नाही. यापूर्वीही असेच जीवघेणे हल्ले पत्रकारांवर झाले आहेत. परंतु, वाईट प्रवृत्तींवर हल्लाबोल करणारी पत्रकारिता आजही सुरूच आहे आणि यापुढेही ती अव्याहतपणे सुरूच राहील. गौरी यांच्यासाठी 3 सप्टेंबरचा लंकेश पत्रिकेचा अंक शेवटचा ठरला. त्या सोशल मीडियावरही सतत क्रियाशील होत्या. धर्मांध प्रवृत्तींविरोधात त्यांनी उचललेली लेखणी ही त्यांच्यासाठी अखेर जीवघेणी ठरली. अशाप्रकारे विरोध करणार्‍या पत्रकारांना संपवण्याच्या घटना देशात सातत्याने होत आहेत अन् त्याबाबत सर्वच फारसे गंभीर नाहीत. बिहारमध्ये दैनिक हिंदुस्तानचे पत्रकार राजदेव रंजन यांची 13 मे 2016 रोजी हत्या झाली. एका खासदाराच्या विरोधात त्यांनी लिखाण केले होते. बलात्कारी बाबा रामरहिम याच्याविरोधात प्रथम आवाज उठवणारे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांचीही 21 नोव्हेंबर 2002रोजी हत्या झाली. 23 जानेवारी 1999 रोजी शिवानी भटनागर या इंडियन एक्स्प्रेसच्या महिला पत्रकाराची राहत्या घरी त्या झाली. ही यादी मारुतीच्या शपटीसारखी वाढतच जाईल. या सर्व पत्रकारांच्या हत्या सत्ताधार्‍यांना उघड आव्हान दिल्यानेच झाल्या आहेत. विचार संपवण्यासाठी हत्या करणे ही विकृती देशात आजघडीला वाढत आहे. धर्मांध आणि सत्तेची ताकद एकत्र नांदत असल्याने एखाद्याची हत्या झाल्यानंतरहीआनंद व्यक्त होत असेल, तर हा अराजकाचा काळ म्हणावा लागेल. सध्या राजकारण बरेच तापलेले दिसते. काँग्रेसने पंतप्रधानांना जाब विचारला असून,उत्तर देण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ही बाब किरकोळ वाटल्याने अशा कुठल्याही बाबीवर पंतप्रधानांनी उत्तर द्यायचे काय? असा सवाल केला आहे. गडकरी असोत की पंतप्रधान मोदी, कुणीही उत्तर दिले नाही, तरी गौरी लंकेश या महिला पत्रकाराची हत्या वाईट प्रवृत्तींविरोधात आवाज उठवल्याने झाली एवढे तरी आज स्पष्ट आहे. कलबुर्गी, पानसरे आणि दाभोलकर यांच्या खुनांचा तपास जसा अद्याप लागला नाही; त्याप्रमाणेच गौरी लंकेश यांच्याही खुनाचा तपास रखडणार का? सत्ताधारी व त्यांच्याशी संबंधित संघटना सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवून लोकांची कशी दिशाभूल करत आहेत, याचा भंडाफोड गौरी यांनी अग्रलेखातून केला होता. पत्रकार रवीश कुमार यांनी सोशल मीडियावर तो भाषांतकरित अग्रलेख प्रसिद्ध केला असून, हा अग्रलेखच गौरी यांची हत्या का झाली असावी याबाबत खूपकाही सांगून जातो. हे हत्याकांड प्रसार माध्यमांसाठी काळा दिवस आहेच, पण समाजासाठीदेखील ही धोक्याची घंटा आहे. एकीकडे गणपती विसर्जनाचा सोहळा सुरू असताना दुसरीकडे पत्रकारितेतील गौरीची झालेली ही हत्या मनाला वेदना देणारी ठरली. या घटनेचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे.