कलबुर्गी हत्येच्या तपासाठी एसआयटी स्थापन करा

0

नवी दिल्ली : ज्येष्ठ साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला नोटीस बजावली. केंद्र सरकारसह महाराष्ट्र पोलीस, गोवा पोलीस आणि कर्नाटक पोलिसांकडूनही कोर्टाने उत्तर मागितले आहे.ऑगस्ट 2015 मध्ये कर्नाटकमधील धारवाड येथे एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली होती.

तिन्ही हत्यांचा एकत्र तपास
एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांना अद्याप मुख्य आरोपींपर्यंत पोहोचता आलेले नाही. पोलिसांच्या संथ तपासावर नाराजी व्यक्त करत कलबुर्गी यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या एकाच पद्धतीने झाली असून या तिन्ही हत्येमागे एकाच संघटनेचा हात असू शकतो, असे कलबुर्गी यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. या तिन्ही हत्येचा एकत्र तपास करुन यासाठी विशेष तपास पथक नेमावे, अशी त्यांची मागणी होती.

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
बुधवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात केंद्र सरकार, कर्नाटक पोलीस, महाराष्ट्र पोलीस, गोवा पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेला नोटीस बजावली आहे. केंद्र सरकार आणि अन्य यंत्रणांच्या उत्तरानंतर सर्वोच्च न्यायालय आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.