कलमाडींच्याआडून खा. शिरोळेंना शह?

0

सुरेश कलमाडींना भाजपात घेण्यासाठी पालकमंत्री गट सक्रीय

पुणे : पुण्यातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे उमेदवारी केलेले युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्याविरोधात ‘चले जाव’चे फलक पुण्यात लागले होते. या फलकबाजीमागचा मेंदू कुणाचा होता, ही बाब काँग्रेस नेतृत्वाच्या निदर्शनास आली आहे. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये परतीचे दोर कापले गेल्यानंतर सुरेश कलमाडी यांनी आता भाजपशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे. तर कलमाडींना पुढे करून खासदार अनिल शिरोळे यांना शह देण्याचा डाव भाजपमधीलच एका गटाने आखला असल्याची माहिती पक्षसूत्राने दिली. खा. शिरोळे व पालकमंत्री गिरीश बापट यांच्या गटातील मतभेद जगजाहीर आहेत. त्यामुळे कलमाडी भाजपमध्ये आले तर ते लोकसभेसाठी उमेदवारी मागतील; परिणामी खा. शिरोळे यांचा पत्ता आपोआप कट होईल, असा कयास एक गट लावून बसल्याने त्यांच्या भाजप प्रवेशासाठी हा गट सक्रीय झालेला आहे. तर कलमाडी यांना भाजपात घेऊन पक्षाला काही फायदा तर होणार नाहीच; परंतु पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसेल, असा कयास खा. शिरोळे गट व्यक्त करत आहे. त्यामुळे कलमाडींशी जवळीक भाजपला अवघड ठिकाणचे दुखणे होऊन बसली आहे.

कलमाडींची काँग्रेसमधील मक्तेदारी संपली!
भारतीय राष्ट्रकुल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री राहिलेले सुरेश कलमाडी हे पुणे काँग्रेसचे गॉडफादर होते. परंतु, राष्ट्रकुल घोटाळ्यात त्यांना कारावासाची शिक्षा भोगावी लागली, तसेच काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. सहा वर्षाकरिता त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेले आहे. त्यामुळे सद्या कलमाडी हे राजकीय विजनवासात आहेत. तथापि, पुण्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या त्यांच्या गटाने महापालिका निवडणुकीत भाजपला राजकीय सहाय्य केल्याची चर्चा रंगते आहे. लोकसभा निवडणुकीत कलमाडी यांनी स्वतःच्या पत्नी मीरा कलमाडी यांच्यासाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. परंतु, काँग्रेसने त्यांची मागणी फेटाळून लावली होती व डॉ. विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे कलमाडी व त्यांच्या कुटुंबीयांची काँग्रेसमधील मक्तेदारी संपुष्टात आली आहे. कलमाडी यांना भाजपात घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट गट कामाला लागला आहे. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून लढण्यासाठी गिरीश बापट यांनी पुरेपूर प्रयत्न केले होते. अगदी शेवटच्याक्षणी भाजपने बापट यांचे तिकीट कापून अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे बापट-शिरोळे यांच्यात दोन राजकीय गट निर्माण झालेले आहे. हे दोन्ही गट एकत्र असल्याचे दाखवित असले तरी, एकमेकांविरोधात कुरघोडीचे राजकारण सुरुच असते. सुरेश कलमाडी यांना भाजपात आणण्यामागे खा. शिरोळे यांना राजकीय शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरु आहे.

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात कलमाडी!
राष्ट्रकुल घोटाळ्यात सुरेश कलमाडी हे देशपातळीवर बदनाम झालेले नाव आहे. त्यांच्यामुळेच देशभरात काँग्रेसचे पानिपत झाले होते. काँग्रेस केवळ लोकसभा निवडणूकच हरली नाही तर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा पराभव झाला होता. पुण्यातील विधानसभेच्या आठही जागा काँग्रेसला कलमाडींमुळे गमवाव्या लागल्यात, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात होत असते. दुसरीकडे, स्वतःचे महत्व सिद्ध करण्यासाठीच कलमाडींनी या निवडणुकांत भाजपला आतून मदत केली होती, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरु असते. त्यामुळे मिशन-2019 साठी भाजपने कंबर कसली असून, सुरेश कलमाडींना भाजपात घेण्यासाठी पालकमंत्री बापट गटाने प्रयत्न सुरु केले आहेत. पुणे महापालिकेत सद्या भाजपची सत्ता आहे. गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्यावतीने जोरदार फलकबाजी करण्यात आली. त्याबद्दल विरोधी पक्षासह शिवसेनेनेही भाजपवर टीका केली होती. परंतु, कलमाडी यांनी महापालिकेचे कौतुक केले. तसेच, विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने कलमाडी यांनी पालकमंत्र्यांसह भाजपनेत्यांसोबत हजेरी लावून अनेकांना धक्का दिला. कलमाडी यांनी सर्वप्रथम कसबा गणपतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. कसबा पेठेत पालकमंत्र्यांचे कार्यालयदेखील असून, कसबा हा बापटांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे कलमाडींची तेथील हजेरी व भाजप नेत्यांचा संग हे पूर्वनियोजित होते, अशी माहितीही सूत्राने दिली.

‘काँग्रेसमुक्त भारता’साठी भाजपला हवी कलमाडींची संगत
शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमाची सांगता समारंभाचे निमंत्रणही महापालिकेच्यावतीने सुरेश कलमाडी यांना देण्यात आले होते. खास करून महापौर मुक्ता टिळक यांनी हे निमंत्रण कलमाडींना दिले होते. त्या कार्यक्रमालाही कलमाडी हजर राहिले. त्यामुळे भाजपचा एक गट कलमाडींना जवळ करत असून, कलमाडीही भाजपमध्ये जाण्याची मानसिकता करत आहेत. कलमाडींना भाजपात घेऊन त्यांचा वापर खा. शिरोळे यांना शह देण्यासाठी करण्याचा विचार एका गटाचा आहे, असा तर्कही भाजपसूत्र व्यक्त करत आहेत. खा. शिरोळे व बापट यांच्यात सख्य असल्याचे दिसून येत असले तरी, एकमेकांचा राजकीय गट मात्र एकमेकांना पाण्यात पाहतो, अशी वस्तूस्थिती आहे. भाजपने काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहिले असून, त्या मोहिमेंतर्गत लवकरच कलमाडीही भाजपात दिसतील. त्यांच्या समर्थकांचा भाजपला आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत फायदा होईल, असा कयासही बांधला जात आहे. कलमाडी व भाजप यांच्यात नेहमीच जवळीक दिसून आली असून, यापूर्वीही कलमाडी यांनी भाजपच्या सहकार्याने पुणे विकास आघाडी बनवून निवडणूक लढविली होती. त्यामुळे कलमाडी आता कधी भाजपात जातात हे पाहणे तेवढे बाकी राहिले आहे. तसे झाले तर पुणेकरांचा भाजपवरून विश्वास उडेल, अशी परिस्थिती आहे.