डॉ. युवराज परदेशी, निवासी संपादक: राज्यात विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. चार महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेली एकहाती सत्ता… महाराष्ट्रात पुर्ण पाच वर्ष चाललेले स्थिर सरकार… सर्वच पक्षातील रथी-महारथींनी भाजपात केलेला प्रवेश व विरोधकांची झालेली दाणादाण…अशा सुपिक मैदानावर भाजपाकडून केलेल्या विकासकामांचा आढावा व भविष्यातील कामांची आश्वासने या द्विसुत्रीभोवती प्रचाराचा धुराळा उडणे अपेक्षित असतांना, भाजपच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी कलम 370 मुद्दा आहे. सत्ताधारी भाजपा कलम 370 वरून संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवताना दिसून येत आहे.
राज्याच्या निवडणुकीत स्थानिक विकासावर बोलण्यापेक्षा कलम 370चा आधार घेत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील झाली. यावर मुख्यमंत्र्यांनी कलम 370 हा भावनिक नाही तर राष्ट्रीय मुद्दा आहे. त्यावर का बोलायचे नाही? असा उलटपक्षी सवाल करत देशभक्तीवर बोलायचा आम्हाला अधिकार आहे. देशभक्तीवर आम्ही बोलत असू तर कुठे चुकले? असे सांगत राष्ट्रवादाच्या आडून मताचा जोगवा मागणे सुरुच ठेवले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद मोदींच्या महाराष्ट्र दौर्याचा शुभारंभ रविवारी जळगाव येथून झाला. जळगाव येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी जवळजवळ 40 मिनिटे भाषण केले. मात्र यापैकी सुमारे 30 ते 32 मिनिटे ते कलम 370 व ट्रिपल तलाकवर बोलले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत भाजपाचे रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांचेही भाषण झाले त्यांनीही पीओके व तिन तलाक या मुद्यांचा आधार घेतला. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी केंद्र शासनाची जनधन योजना व राष्ट्रीय विकासावर भाष्य केले. याचवेळी शिवसेनेचे माजी आमदार व पारोळ्याचे उमेदवार चिमणआबा पाटील यांनी स्थानिक मुद्यांना हात घालत नार-पार व सात बलुन बंधार्यांचा विषय मांडला. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहूल गांधी यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करत तापी मेगा रिचार्ज, नार-पार व जळगाव महापालिकेची कर्जमुक्तीचा ओझरता उल्लेख केला. यानंतर मोदी यांच्या भाषणाची सर्वांना उत्सुकता होती, कारण यापुर्वी 2014 ची लोकसभा निवडणूक व त्यानंतर गत विधानसभा निवडणुकीत अशा दोन वेळा मोदींच्या जळगाव जिल्ह्यात सभा झाल्या आहेत. या दोन्ही सभांमध्ये त्यांनी जळगाव जिल्ह्यातील कापूस व केळी उत्पादकांवर भाष्य करत जळगाव व गुजरातचे कनेक्शन जोडत शेतकर्यांना साद घातली होती. यामुळे यंदा मोदी काय बोलतात, याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र त्यांचे भाषण कलम 370 व ट्रिपल तलाकच्या विषयाभोवतीच फिरले.
काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुफान हल्ला चढवित हिंमत असेल तर विरोधकांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोदी सरकारने हटवलेले कलम 370 व ट्रिपल तलाक पुन्हा लागू करून दाखवण्याचे आव्हान दिले. मात्र याच वेळी शरद पवारांवर टीका करतांना त्यांचे नाव घेण्याचे मोदींनी टाळले. मोदींची जळगाव येथे सभा सुरु असतांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लातूरमधील औसा येथील प्रचारसभेत, मोदी सरकारवर टीका करतांना मुळ मुद्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच भाजप काश्मीर, कलम 370, चांद्रयान या मुद्यांचा वापर करत असल्याचा आरोप केला. हे आरोप-प्रत्यारोप 21 तारखेपर्यंत सुरुच राहतील परंतू बालाकोटनंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपाच्या गोटात जसे आश्वस्त झाल्याचे वातावरण होते, तसे परत आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कलम 370च्या निर्णयानंतर दिसून येत आहे. या निर्णयाचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर परिणाम निश्चितपणे होणारच असल्याची जाणीव भाजपाच्या नेत्यांना असल्याने स्थानिक मुद्दे बाजूला ठेवून ही निवडणूक कलम 370 भोवती केेंद्रीत
झाली आहे.