कलाकारांनी माणुसकीचे भान ठेवून गरीबांना मदत करावी

0

भुसावळ । कलाकारही समाजाचे देण लागतो, त्यामुळे कलाकारांनी माणुसकीचे भान ठेवून समाजातील वंचित घटकांना मदत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गरीब, शेतकर्‍यांसाठी झटणारे जगन सोनवणे यांचे काम ऐकून आम्ही त्यांच्या एका हाकेवर येथे आलो आहोत. जगन सोनवणे यांचे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक विजू माने यांनी व्यक्त केले.

चित्रपट अभिनेत्यांची होती उपस्थिती
भारतीय ओडबसम क्रांतीचे प्रमुख जगन सोनवणे, नगरसेविका पुष्पा सोनवणे यांनी रेल्वे कलामंदीर येथे आयोजित केलेल्या शाळकरी मुलामुलींना वह्या वाटप व आर्थिक मदत देण्याच्या कार्यक्रमासाठी माने आले होते. त्यांच्या सोबत चित्रपट कलाकार तथा ‘चला हवा येवू’ द्या फेम हास्य कलाकार कुशल बद्रीके, चित्रपट अभिनेत्री मिरा जोशी, सीने कलाकर तथा वेश भूषाकार प्रिया वैद्य उपस्थित होत्या.

सोनवणेंचे कर्तृत्व मोठे
चित्रपट अभिनेते तथा विनोदी कलाकार कुशल बद्रीके म्हणाले की, समाज आज खुप मागे पडत चालला आहे, पण त्यासाठी जगन सोनवणेंसारखा एकटा माणूस जेव्हा त्यांच्यासाठी उभा राहतो तेव्हा आम्ही कलाकार म्हणून देखील समाजाचे देण लागतो. शेतकरी व कष्टकर्‍यांसाठी उभे राहणारे जगन सोनवणे यांचे कर्तुत्व मोठे असून त्यात आमचा देखिल खारीचा वाटा असावा म्हणून मी येथे आलो असल्याचे सांगितले.

जनतेने साथ द्यावी
विजू माने पुढे म्हणाले की, राज्यात जो कुणी गरीबांसाठी काम करतो त्याच्या पाठीशी आम्ही असतोच. गरीब, शेतकरी, मोलकरीण यांच्यासाठी आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठवणार्‍या जगन सोनवणे यांचा आवाज विधानसभेत ऐकायचा आहे. यासाठी आम्ही त्यांना मदत करणार असून जनतेने देखील त्यांंना साथ द्यावी. तळागळातील लोकांसाठी कामे करणार्‍यांसोबत राहण्याचा आमचा वैयक्तीक निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.